उन्हाळा आला की आंब्याच्या गोडसर सुगंधाने संपूर्ण बाजारपेठ फुलून जाते. लालसर-पिवळसर रंगाची फळं, टोकदार सुगंध आणि गोडसर रसामुळे ‘फळांचा राजा’ अशी ओळख लाभलेल्या आंब्याची जादूच वेगळी आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की या आंब्याच्या दुनियेत एक असा प्रकार आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये जाते आणि जो ‘सोन्यासारखा’ जपला जातो? हे ऐकून थोडं अचंबित वाटेल, पण हे खरं आहे आणि हा आंबा भारतातच पिकतो.
मियाझाकी आंबा
या दुर्मीळ आणि महागड्या आंब्याचं नाव आहे मियाझाकी. जगात सर्वात महागडा मानला जाणारा हा आंबा ‘एग ऑफ द सन’ या नावानेही ओळखला जातो. त्याचा गडद लालसर रंग, विलक्षण चव आणि विलक्षण पोत यामुळे तो इतर कोणत्याही आंब्यापेक्षा वेगळा वाटतो. याचा आकार जरा मोठा, वजन अंदाजे 350 ग्रॅम असते, पण त्याची खरी किंमत त्याच्या दुर्मीळतेत आणि दर्जामध्ये आहे.
मियाझाकी आंबा मूळचा जपानमधील आहे, पण विशेष म्हणजे हा आंबा आता भारतातही यशस्वीपणे पिकवला जात आहे, तेही मध्य प्रदेशात. जबलपूरजवळील काही शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन या महागड्या जातीचा प्रयोग केला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला. भारतात असे फार थोडे शेतकरी आहेत जे मियाझाकीचे उत्पादन करतात, त्यामुळे त्याची मागणी भरपूर असली तरी उपलब्धता मर्यादित असते.
आंब्याची किंमत किती?
या आंब्याची किंमत ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. एक किलो मियाझाकी आंब्यासाठी सध्या बाजारात 2.5 लाख ते 3 लाख रुपये मोजावे लागतात. ही किंमत केवळ त्याच्या दुर्मिळतेमुळे नाही, तर त्यात असलेल्या पौष्टिक गुणधर्मांमुळेही आहे. मियाझाकी आंब्यामध्ये बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात.
त्यामुळे या आंब्याचा आनंद फक्त चवेसाठी नाही, तर आरोग्यासाठीसुद्धा घेतला जातो.आजकाल सोशल मीडियावरही मियाझाकी आंब्याचे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. लालसर आंब्यांच्या झाडांभोवती सुरक्षा रक्षकांची व्यवस्था ठेवली जाते, कारण त्याची किंमत पाहता चोरीचा धोका खूप जास्त असतो.