मालदीव, पाकिस्तान, भारत…कोण सर्वाधिक अन्न वाया घालवतं? आशियातील अन्न वाया घालवणाऱ्या देशांची यादी समोर!

Published on -

आपण एकीकडे डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी आणि जागतिक महाशक्ती बनण्याची स्वप्नं पाहतो, पण त्याचवेळी दरवर्षी लाखो टन अन्नही वाया घालवतो. भारतातील हे चित्र नक्कीच अस्वस्थ करतं. अन्न, जे एखाद्याच्या जीवनाचा आधार असतं, ते फुकट घालवणं ही केवळ नैतिकच नव्हे तर आर्थिक आणि पर्यावरणीय हानीही आहे. विशेषतः जेव्हा आपण भारतासारख्या देशात राहतो, जिथं आजही कोट्यवधी लोक दररोज पोटभर जेवणासाठी संघर्ष करत आहेत.

चीन पहिल्या नंबरवर

अशा स्थितीत, आशियामधील अन्न वाया घालवणाऱ्या देशांचा आकडा पाहिला तर धक्कादायक सत्य समोर येतं. चीन पहिल्या क्रमांकावर असून दरवर्षी जवळपास 91.6 दशलक्ष टन अन्न तिथं वाया जातं. ही संख्या केवळ लोकसंख्येच्या प्रमाणामुळे नाही, तर अन्न वितरणातील असमतोल, जास्तीची खरेदी आणि अनावश्यक स्वयंपाक यांसारख्या सवयींमुळेही आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकूण अन्न वाया घालवण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारत दुसऱ्या नंबरवर

भारतामध्ये दरवर्षी सुमारे 68.8 दशलक्ष टन अन्न वाया जातं, आणि याचा आर्थिक फटका तब्बल 92,000 कोटी रुपयांचा आहे. एका व्यक्तीकडून दरवर्षी सुमारे 55 किलो अन्न फेकलं जातं, हा आकडा पाहून मन सुन्न होतं. अन्न वाया घालवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अकार्यक्षम साठवणूक व्यवस्था, अपुरी पुरवठा साखळी, आणि सर्वसामान्यांच्या अनागोंदी सवयी. भारतासारख्या देशात, जिथं 23.4 कोटी लोक अजूनही कुपोषणाचा सामना करत आहेत, तिथं हे दृश्य खूपच विरोधाभासी वाटतं.

पाकिस्तान कितव्या स्थानावर?

मालदीव, जो लोकसंख्येच्या तुलनेत छोटा देश आहे, तिथं प्रति व्यक्ती 207 किलो अन्न फेकलं जातं, आणि पाकिस्तानमध्ये हा आकडा 122 किलो आहे. या सगळ्या वाया गेलेल्या अन्नामुळे पर्यावरणावरही भीषण परिणाम होतो. अन्नकचरा एकटा 8 ते 16 टक्के हरितगृह वायूंचं कारण आहे. भारतासाठी तर हे थेट आर्थिक नुकसानही आहे, जीडीपीच्या 1 टक्क्याच्या आसपास.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण प्रत्येकजण काही तरी करू शकतो. लग्नसमारंभात उरलेलं अन्न गरजूंपर्यंत पोहोचवता येतं. आपल्या घरात गरजेपेक्षा जास्त अन्न बनवणं टाळू शकतो.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2030 पर्यंत दरडोई अन्न अपव्यय निम्मं करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!