गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर भरपाई मिळते का? जाणून घ्या विमा पॉलिसीचा फॉर्म्युला!

Published on -

स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असलेला एलपीजी सिलिंडर अनेकदा आपण सहजपणे वापरत असतो, पण त्याची एक छोटीशी दुर्लक्ष केलेली माहिती आपल्या सुरक्षिततेवर मोठं संकट आणू शकते. कारण, एलपीजी सिलिंडरही कालबाह्य होतात आणि जर असा कालबाह्य सिलिंडर वापरला, तर तो गॅसच्या दाबाला सहन न करू शकल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने याची माहिती जाणून घेणं अत्यावश्यक आहे.

जेव्हा गॅस सिलिंडर त्याच्या वापरण्याच्या मुदतीनंतरही वापरण्यात येतो, तेव्हा त्यात गॅसचा दाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. जर त्या दरम्यान आगीचा संपर्क झाला, तर तोफासारखा स्फोट होण्याचा धोका असतो. अशा स्फोटांमध्ये केवळ वस्तूंचं नुकसान नाही, तर जीवितहानीही होऊ शकते. पण या धोक्याचा अंदाज घेण्याचा एक साधा उपाय म्हणजे सिलिंडरवर लिहिलेली ‘कालबाह्यता तारीख’.

 

सिलिंडरची एक्सपायरी कशी ओळखाल?

सिलिंडरच्या वरच्या बाजूस तीन पट्ट्यांपैकी एका पट्ट्यावर A-23, B-24, C-25 अशा कोडिंग स्वरूपात ही तारीख असते. यातील अक्षर हे वर्षाचे तिमाही दर्शवते. A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. या अक्षरासोबत असलेली संख्या संबंधित वर्ष दाखवते. उदाहरणार्थ, C-25 म्हणजे हा सिलिंडर सप्टेंबर 2025 नंतर वापरण्यासाठी अयोग्य मानला जातो.

मात्र ही माहिती इथेच संपत नाही. एलपीजी सिलिंडर वापरताना तुम्ही फक्त गॅस पुरवठ्यावर अवलंबून नसता, तर एक ‘विमा कवच’ देखील तुमच्या नावावर असतो आणि अनेकांना त्याची कल्पनाही नसते. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या कंपन्यांच्या वतीने ग्राहकांना ही विमा सुविधा मिळते. गॅस सिलिंडरमुळे घरात झालेल्या कोणत्याही अपघातात, जर जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं, तर या विम्याअंतर्गत ₹50 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते.

विमा लाभ कसा घ्याल?

या विम्याचा लाभ घेण्यासाठी, काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विमा फक्त त्या सिलिंडरसाठी लागू होतो ज्याची मुदत संपलेली नसते. अपघातानंतर 30 दिवसांच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून, वितरकाला याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर एफआयआर, वैद्यकीय अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, नुकसानाची माहिती, यासारख्या कागदपत्रांसह तुम्ही विम्याचा दावा करू शकता.

पण, एलपीजी सिलिंडर आपल्या रोजच्या वापरातील वस्तू असल्याने त्याच्या सुरक्षित वापराची जबाबदारी आपली आहे. वेळेवर तपासणी, सिलिंडरवरील तारीख तपासणं आणि गॅस वितरकाकडून अचूक माहिती घेणं या साध्या उपायांनी तुम्ही आणि तुमचं कुटुंब एका मोठ्या अपघातापासून वाचू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!