क्रिकेट इतिहासातील 6 दुर्मिळ क्षण, जेव्हा भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघात खेळले! कुठे आणि कधी खेळवण्यात आले हे सामने?

भरतात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच भारत आणि पाकिस्तान सामना म्हटला की प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जसे अनेक वेळा तणावपूर्ण राहिले, तसंच त्यांच्या क्रिकेट विश्वातही एकमेकांशी भिडण्याच्या संधी मर्यादित होत्या. मात्र, कधी कधी ही सीमारेषा क्रिकेटच्या मैदानावर नष्ट झालेली दिसते. विशेषतः इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये, जिथे या दोन देशांचे खेळाडू एकाच संघात खांद्याला खांदा लावून खेळले.

बिशन सिंग बेदी आणि मुश्ताक मोहम्मद

सर्वात पहिल्या अशा क्षणांची सुरुवात झाली होती 1970 च्या दशकात, जेव्हा भारताचे फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांनी इंग्लंडच्या नॉर्थम्प्टनशायर संघात सहभाग घेतला. तिथेच पाकिस्तानचे अनुभवी खेळाडू मुश्ताक मोहम्मद आणि सरफराज नवाज हे देखील त्याच संघात खेळत होते. हे सर्व खेळाडू एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून सहकारी होते, आणि त्यांच्यातील मैत्रीचे धागे पुढे देशाचे प्रतिनिधित्व करत असतानाही दृढ राहिले.

झहीर खान आणि अझहर महमूद

यानंतर पुढे झहीर खान आणि अझहर महमूद यांनीही 2004 मध्ये सरे संघात एकत्र खेळत मैत्रीचा हा धागा पुढे नेला. त्याचप्रमाणे, हरभजन सिंग याचाही 2005 मध्ये सरे संघात काही काळासाठी समावेश झाला, जिथे अझहर महमूद, मोहम्मद अक्रम या पाकिस्तानी सहकाऱ्याबरोबर त्याने मैदानात पावले टाकली.

अनिल कुंबळे आणि अझहर महमूद

2006 मध्ये, भारतीय फिरकी दिग्गज अनिल कुंबळे यांनी त्यांचा शेवटचा काउंटी हंगाम अझहर महमूद आणि मोहम्मद अक्रमसोबत खेळला होता. या काळात खेळाच्या सीमारेषा अगदीच पुसट झाल्यासारख्या वाटतात.

चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिझवान

2022 मध्ये चेतेश्वर पुजारा, जो भारतीय कसोटी संघातील शांत आणि स्थिर फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्याने इंग्लंडच्या ससेक्स संघातून पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानसोबत एकत्र खेळ खेळला. त्याच हंगामात त्याने 1,094 धावा केल्या आणि पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघात आपले स्थान मिळवले.

इशान किशन आणि मोहम्मद अब्बास

अशात 2025 मध्ये, एक नवा अध्याय लिहिला जातो आहे. नॉटिंगहॅमशायर संघात भारताचा तरुण यष्टीरक्षक इशान किशन आणि पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास हे दोघे एकत्र खेळत आहेत.