कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक अण्वस्त्रं?, ती नेमकी ठेवलीत तरी कुठे? मोठी माहिती समोर!

जगभरात शांती आणि सुरक्षिततेची भाषा केली जाते, मात्र त्या पलीकडे काही तरी भयंकर वास्तव देखील लपलेलं आहे, ते म्हणजे अण्वस्त्रं. ती ना उघडपणे मिरवली जातात, ना त्यांची जागा माहीत असते. मात्र ही अण्वस्त्रं केव्हा वापरली जातील हे कोणीही सांगू शकत नाही. जगातील शक्तिशाली देशांनी ही महाविनाशकारी शस्त्रं समुद्राच्या खोलवर, पर्वतांच्या पोटात आणि इतर अनेक गुप्त ठिकाणी लपवून ठेवली आहेत. आणि त्याचं भय इतकं आहे की, शास्त्रज्ञांनाही त्याच्या अनिश्चिततेची भीती वाटते.

आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ताज्या अहवालांनुसार, 2025 च्या सुरुवातीस जगात एकूण 12,241 अण्वस्त्रं अस्तित्वात असतील. त्यापैकी जवळपास 9,600 शस्त्रं लष्करी वापरासाठी सदैव सज्ज ठेवण्यात आली आहेत, म्हणजेच ती कधीही वापरली जाऊ शकतात. या आकड्यांमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 87 टक्के अण्वस्त्रं फक्त दोन देशांकडे आहेत अमेरिका आणि रशिया. अमेरिकेकडे 5,177 अण्वस्त्रं आहेत, तर रशियाकडे 5,459. इतर सर्व देश मिळून उर्वरित 13 टक्के अण्वस्त्रांचे मालक आहेत.

ही शस्त्रं फक्त असणंच भीतीदायक नाही, तर ती कुठे ठेवली आहेत, हेही अधिक धोकादायक आहे. जगातील अनेक देशांनी आपल्या अण्वस्त्रांना भूमिगत तळांमध्ये, बंकरमध्ये, पर्वतांमध्ये आणि विशेषतः पाणबुड्यांवर ठेवले आहे. या पाणबुड्या खोल समुद्रात सतत गस्त घालत असतात, आणि त्यांच्या आत असतात विनाशकारी क्षमतेची अण्वस्त्रं, जी क्षणार्धात हजारो किमी दूर लक्ष्यावर मारा करू शकतात.

अमेरिका-रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्र

अमेरिकेच्या अण्वस्त्रांची काही तुकडी युरोपमधील जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, इटली आणि तुर्कीमध्येही तैनात करण्यात आली आहे, जिथे हे देश स्वत: अण्वस्त्रशक्ती नसले तरी नियंत्रण मात्र अमेरिकेकडेच आहे. रशियानेही अलिकडेच बेलारूसमध्ये अण्वस्त्रं तैनात करण्यास सुरुवात केल्याचा दावा केला आहे. ही स्थिती जितकी क्लिष्ट, तितकीच घाबरवणारी आहे.

याशिवाय, काही देश तर आपली अण्वस्त्रं गुप्त ठेवण्यात अजूनच आघाडीवर आहेत. चीन, उत्तर कोरिया आणि इस्रायल हे असे देश आहेत ज्यांच्याकडील अण्वस्त्रांची अचूक माहिती अजूनही जगापासून लपवून ठेवलेली आहे. चीनने फक्त एका वर्षात 200 हून अधिक अण्वस्त्रं तयार केल्याचं म्हटलं जातं, आणि आता त्यांच्याकडे 600 पेक्षा अधिक अण्वस्त्रं आहेत. उत्तर कोरिया आणि इस्रायलबद्दल तर अधिकृत माहिती मिळणं जवळपास अशक्यच आहे.

शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

या सगळ्या पार्श्वभूमीवर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (SIPRI) इशारा दिला आहे की, जग आता एका नव्या आणि अत्यंत धोकादायक अण्वस्त्र युगात प्रवेश करत आहे. हे युग केवळ मोठ्या अण्वस्त्रांचं नाही, तर लहान, सहज लपवता येणाऱ्या आणि अत्यंत प्रभावशाली शस्त्रांचं आहे. जी एका क्षणात संपूर्ण शहरं उद्ध्वस्त करू शकतात.

शास्त्रज्ञांची सर्वात मोठी चिंता हीच आहे की, ही शस्त्रं जर चुकून अपघाताने किंवा एखाद्या अतिरेकी संघटनेच्या हाती लागली, तर त्या एका क्षणात मानवतेचा इतिहास संपुष्टात येऊ शकतो.