आपल्या आजूबाजूला फार कमी अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक दिसतात, ज्यांनी वयाची शंभरीही पार केलेली असते. मग प्रश्न पडतो की, ही लोक इतकी वर्षे कशी काय जगतात आणि तेही निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहून? जपानसारख्या देशात तर शंभरी गाठणं ही काही विशेष गोष्ट नाही. तिथले अनेक लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात, आणि त्यातही बहुतेक जण शेवटपर्यंत स्वावलंबी आणि उत्साही असतात. यामागे ना कोणतं महागडं औषध आहे, ना कोणतं गुप्त रामबाण. ही सगळी कमाल आहे त्यांच्या साध्या पण शिस्तबद्ध जीवनशैलीची, ज्यात काही खास सवयी त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य ठरतात.

जेवणाची पद्धत
सर्वात पहिली आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या जेवणाची पद्धत. जपानी लोक जमिनीवर वज्रासनात बसून अन्न खातात. ही केवळ शारीरिक पोझिशन नसून, त्यामागे आरोग्याचं मोठं गणित आहे. वज्रासनात बसल्याने पचनक्रिया उत्तम राहते, शरीराचा पोस्चर बरोबर राहतो, आणि त्यामुळे गॅस, अॅसिडिटीसारख्या सामान्य तक्रारी जवळपास नसायच्या. आपण पोटभर जेवलो की लगेच साखरझोप घ्यायची सवय लावतो, पण हे लोक अन्नाला शरीरात व्यवस्थित उतरू देतात.
रात्रीच्या जेवणाची वेळ
दुसरी लक्षवेधी सवय म्हणजे रात्रीचं जेवण खूप लवकर म्हणजेच सूर्यास्त होण्याआधीच उरकून टाकणं. यामुळे त्यांचं शरीर रात्री विश्रांती घेत असतानाच डिटॉक्स आणि सेल्सची दुरुस्ती करतं. ही प्रक्रिया ‘ऑटोफॅगी’ म्हणून ओळखली जाते आणि ती तुमचं शरीर आतून स्वच्छ आणि तरतरीत ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरते. आपण जेव्हा उशिरा जेवतो, तेव्हा शरीराला विश्रांतीची वेळ मिळत नाही, उलट ते पचनातच अडकून पडतं.
साधी जीवनशैली
तिसरं, आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची साधेपणाकडे झुकलेली जीवनशैली. प्रथिनांची पावडर, पॅकेज्ड डाएट, फॅन्सी डिटॉक्स ड्रिंक्स हे काही त्यांचं रोजचं अन्न नाही. जपानी लोक घरगुती, ताजं, रसायनविरहित आणि पारंपरिक अन्न खातात. त्यांना पदार्थात सौंदर्य नव्हे, तर पौष्टिकता महत्त्वाची वाटते. रोजचे धान्य, भाज्या, फळं, थोडीशी मासळी यावरच त्यांचं आयुष्य उभं आहे.
हे सगळं पुरेसं नाही, जपानी लोक आपल्या मनाचाही तितकाच विचार करतात. दररोज थोडा वेळ ध्यान करणे, काही मिनिटं शांत बसणे आणि शरीरासाठी आवश्यक ती झोप घेणे हे सगळं त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. धावपळ, सततचा ताण, कुणाशी तरी स्पर्धा या गोष्टींपासून ते शक्य तितकं दूर राहतात. त्यामुळेच ते केवळ दीर्घायुष्य जगत नाहीत, तर ते आयुष्य आनंदाने जगतात.