दूध आणि फळं दोन्ही शरीरासाठी पोषणदायी आहेत. पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घेतली नाही, तर ती लाभदायक न ठरता अपायकारक ठरू शकते. विशेषतः काही फळं अशी आहेत जी दुधासोबत घेतल्यावर शरीरात ‘विषासारखी प्रतिक्रिया’ निर्माण करू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

कधी कधी आपण सकाळच्या वेळेस किंवा थकवा दूर करण्यासाठी फ्रूट मिल्कशेक घेतो. पण त्यात जर चुकीचं फळ असेल, तर हे पेय आरोग्यदायी अपचन, गॅस, सर्दी-खोकल्याचं कारण ठरू शकतं. त्यामुळे अशा काही फळांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे जी दुधासोबत घेऊ नयेत.
आंबट फळं
सर्वात पहिले म्हणजे आंबट फळं. संत्रं, लिंबू, द्राक्षं किंवा हंगामी आंबट फळं दुधात मिसळल्यास, त्यातील सायट्रिक अॅसिड दुधातील प्रथिनांशी प्रतिक्रिया देऊन पोटात गोंधळ निर्माण करतं. अशा मिश्रणामुळे अपचन, आम्लता आणि गॅससारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं.
केळी
दुसरं फळ म्हणजे केळी. कित्येकजण दुधात केळी मिसळून त्याचा शेक घेतात. पण खरं सांगायचं तर केळी आणि दूध यांचा संगम प्रत्येकासाठी योग्य नाही. शरीरात जडपणा जाणवणं, पचन मंदावणं, आणि थोड्या वेळाने सर्दी किंवा खोकल्यासारखी लक्षणं दिसणं हे या मिश्रणाचे परिणाम असू शकतात. विशेषतः ज्यांचं पचन आधीपासूनच नाजूक आहे, त्यांनी हे टाळावं.
खरबूज आणि टरबूज
खरबूज आणि टरबूज ही फळं उन्हाळ्यातील आवडती असली, तरी त्यांना दुधाच्या जवळही नेऊ नये. ही फळं थंड आणि पाण्याने भरलेली असतात. त्यामुळे दूधासोबत घेतल्यास ते सहज पचत नाही. पोटात या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास ते कुजण्यासारखी स्थिती तयार होते. परिणामी गॅस, अपचन आणि जडपणासारखे त्रास होऊ शकतात.
अननस
शेवटी अननस हे फळ खूप पौष्टिक आणि चवदार असलं तरी याचं दुधाशी सूत जमणं कठीण आहे. अननसातील अॅसिड आणि दुधातील प्रथिनं एकत्र आल्यावर पचनसंस्थेला त्रास होतो. यामुळे पोट फुगणं, गॅस आणि कधी कधी उलटीसुद्धा होऊ शकते.