तुम्ही कधी असा विचार केलाय का, की पृथ्वीवर एखादं ठिकाण असावं जिथे ना डासांचा त्रास, ना सापांची भीती, ना सरपटणाऱ्या कीटकांची अडचण? हे ऐकून खोटं वाटेल, पण खरोखरच असा एक देश आहे जिथे हे सगळं अस्तित्वातच नाही! ही जागा म्हणजे आइसलँड. एक थंड, शांत, आणि निसर्गाच्या विलक्षण किमयांनी भरलेलं बेट, जिथे नुसती भटकंतीच नाही, तर जीवसृष्टीच्या काही अत्यंत विस्मयकारक गोष्टी अनुभवायला मिळतात.

आइसलँड
आइसलँडचं हवामान म्हणजे इथल्या अजब दुनियेचं गुपित. इथं वारंवार बदलणारे तापमान, थंड वारे आणि वर्षभरात अनेकदा पडणारा बर्फ हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. डास हे असे जीव आहेत, ज्यांना आपलं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी उबदार हवामान आणि स्थिर पाण्याची गरज असते. पण आइसलँडमध्ये अशी परिस्थिती क्वचितच असते. इथे पावसाच्या पाण्याच्या साठ्यांवर पटकन बर्फ साचतो, त्यामुळे डासांच्या अळ्यांना वाढण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण कधीच मिळत नाही. परिणामी, इथे डास अस्तित्वातच येत नाहीत.
आइसलँडमधील हवामान
साप आणि सरपटणारे प्राणीही याच गोष्टींच्या बळी ठरतात. त्यांच्या शरीराला थंडी सहन करण्याची नैसर्गिक क्षमता नसते. आइसलँडची जमीन, हवामान आणि तिथला भूगोल अशा प्रकारे रचलेला आहे की अशा प्राण्यांसाठी तिथे जगणं जवळपास अशक्य होऊन जातं. त्यामुळे इथे साप, पाल किंवा सरडे काहीच दिसत नाहीत.
गमतीची गोष्ट म्हणजे, आइसलँडच्या आजूबाजूच्या देशांमध्ये ग्रीनलँड, स्कॉटलंड, नॉर्वे किंवा डेन्मार्कमध्ये डास आणि इतर कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. पण आइसलँडचं हवामान इतकं अस्थिर आहे की, तिथे डासांना कोणतीही पूर्वतयारी करता येत नाही.
त्यामुळे ते फार काळ टिकतही नाहीत. इथे फक्त एक ऐतिहासिक नोंद सापडते, 1980 मध्ये एका संशोधकाला एक डास सापडला होता, आणि तोही फक्त अभ्यासासाठी संग्रहित ठेवण्यात आला.