अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-नगर पोलिस दलात आज एका ‘अर्थ’पूर्ण ऑडिओ क्लिपने एकच खळबळ उडाली. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड व नेवाशातील गर्जे नावाच्या कर्मचाऱ्यामध्ये हा संवाद झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियातून ही “ऑडिओ क्लिप’ मोठ्या प्रमाणात “व्हायरल’ झाल्यावर हा प्रकार समोर आला.
याच “ऑडिओ क्लिप’मुळे डॉ. राठोड यांची उचलबांगडी झाल्याचे समजते. डॉ. राठोड यांच्यासह अन्य एका अधिकाऱ्यालाही ही “ऑडिओ क्लिप’ भोवल्याची चर्चा आहे. मात्र, “ऑडिओ क्लिप’च्या चौकशीनंतरच खरा प्रकार समोर येणार आहे.
महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर रुजू झालेले डॉ. दत्ताराम राठोड यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून यात ते माल मिळेल का? अशी थेट विचारणा करत असल्याचा आवाज आहे. एका पोलीस कर्मचार्यांशी झालेल्या त्यांच्या ‘अर्थ’ पूर्ण संभाषणामुळे ही क्लीप जिल्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी या प्रकरणारची गंभीर दखल घेतली असून डॉ. राठोड यांची तडकाफडकी बदली करण्यासोबतच सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गुटखा, वाळू,
जुगार याबरोबरच बेकायदेशीररित्या डिझेलची होत असलेली विक्री, बेकायदा फटक्याचा साठा यावर त्यांनी छापे टाकून लाखोचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात सुरू असलेली छापेमारी यामुळे अवैध धंद्या करणार्यांचे धाबे दणाणले. डॉ. राठोड यांच्या कार्यकाळात 21 गुन्हे दाखल करत 27 आरोपींना गजाआड केले.
65 लाखाचा मुद्देमालही जप्त केला. त्यातचे त्यांचे नेवासे येथील पोलीस कर्मचारी गर्जे याच्याशी मोबाईलवर झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली. त्यात थेट माल मिळेल का? की रेड टाकू असे संभाषण आहे. या क्लिपमुळेच डॉ. राठोड यांची तडकाफडकी बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ऑडिओ क्लीपशी माझा संबंध नाही. याविषयी मला काहीच माहिती नाही. माझ्याविषयी हे षडयंत्र रचले असून मंत्र्यांनी बनावट ऑडिओ क्लीप तयार केली असेल. चांगले काम केले म्हणून मला त्रास दिल्याने मी मंत्री व आमदारांची तक्रार राज्याचे पोलीस महासंचालकाकडे केलेली आहे, अशी प्रतिक्रिया तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved