तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू, स्मृती मंधानाने रचला नवा इतिहास!

Published on -

भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा स्मृती मंधानाने तिच्या बॅटने केवळ धावा केल्या नाहीत, तर इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला. नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात तिने अशी खेळी साकारली की ती संपूर्ण जगाच्या नजरा वेधून घेणारी ठरली.

सामना इंग्लंडविरुद्ध होता. प्रतिस्पर्धी संघ घरच्या मैदानावर खेळत होता. पण स्मृती मंधाना जेव्हा मैदानात उतरली, तेव्हा तिने केवळ धावा नाही तर आत्मविश्वासही पेरला. 28 वर्षांच्या मंधानाने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकलं. 62 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत तिने 112 धावा केल्या. या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने केवळ 5 गडी गमावत 210 धावांचा डोंगर उभारला.

स्मृती मंधानाची कामगिरी

मंधानाची ही खेळी केवळ एका सामन्यापुरती मर्यादित राहिली नाही. या खेळीमुळे ती भारतीय महिला क्रिकेट इतिहासात एक अनोखी जागा पटकावत तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये आधीच तिच्या नावावर 11 शतके आणि कसोटीत 2 शतके होतीच. पण टी20 फॉरमॅटमध्ये शतक झळकावून तिने नवा रेकॉर्ड केला.

स्मृतीची ही कामगिरी तिच्या 149व्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आली. क्रिकेटमध्ये ‘दिवस चांगला असावा लागतो’ असं म्हटलं जातं, पण स्मृतीने केवळ दिवस जिंकला नाही, तर मनंही जिंकली. इंग्लंडचा संपूर्ण संघ भारताच्या गोलंदाजांसमोर केवळ 113 धावांवर गारद झाला आणि भारताने तब्बल 97 धावांनी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

इतर महिला खेळाडूंचा रेकॉर्ड

या विक्रमी कामगिरीमुळे स्मृती आता टी20 मध्ये शतक ठोकणारी फक्त दुसरी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. याआधी केवळ हरमनप्रीत कौरने 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावा करत हे यश मिळवलं होतं.

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटच्या रेकॉर्डवर नजर फिरवली, तर मंधाना आता फक्त भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगातील पाचवी अशा फलंदाज ठरली आहे जिने सर्व तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे. टॅमी ब्यूमोंट, हीदर नाईट, लॉरा वोल्वार्ट आणि बेथ मून या नामांकित फलंदाजांच्या यादीत आता भारताची ‘स्मायली क्वीन’ स्मृती मंधानाचाही समावेश झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!