Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १८ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १३ आरोग्य केंद्र सुरू झाली असून, अन्य तीन आरोग्य वर्धिनी केंद्रांना अद्यापि जागा मिळालेली नाही. महापालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे. जागा मिळाल्यास तिथे तत्काळ फॅब्रिकेटेड इमारत उभी करून आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या आणि मध्यमवर्गी नागरिकांना तात्कळ सरकारी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागांतर्गत महानगरीय शहरांमध्ये आरोग्य वर्धिनी केंद्रांची योजना राबविण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी, पचिरचारिका व अन्य कर्मचारी असे स्वतंत्र कर्मचारी प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१८ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी
आरोग्य विभागाच्या सहायक संचालकांच्या अधिपत्याखाली अहिल्यानगर शहरात सात आरोग्य केंद्रांतर्गत १८ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १३ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने जुन्या इमारती पाहून त्याची डागडुजी करून केंद्र सुरू केले आहेत. १३ पैकी सहा ठिकाणी केवळ जागा उपलब्ध असल्याने प्री फॅब्रिकेटेड इमारत उभी करून आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले.
तीन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात
उर्वरित पाच पैकी मुकुंदनगर, सूर्यानगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत ती सुरू होतील. मात्र, अद्यापि तीन आरोग्य केंद्रांना महापालिकेला जागाच उपलब्ध झालेली नाही.
तीन केंद्राना जागाच मिळेना
त्यात शास्त्रीनगर केडगाव, रामवाडी, रेल्वेस्थानक परिसर अशा तीन ठिकाणच समावेश आहे. शास्त्रीनगर येथे जागा उपलब्ध आहे. मात्र, आरोग्य केंद्र सुरू करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. उर्वरित दोन ठिकाणी जागाच उपलब्ध झालेली नाही. महापालिकेकडे सर्वत्र भुखंड असताना आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा मिळत नाही. दरम्यान, कल्याण रोड, बोल्हेगाव, तपोवन रोड, सिद्ध्द्धर्थनगर, फराहबाग, निर्मलनगर, वैदूवाडी, नालेगाव, इंदिरानगर अरणगाव रोड येथे आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १८ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १३ केंद्र सुरू करण्यात आले असून, उर्वरित केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील. – डॉ. सतीश राजूरकर, प्रभारी आरोग्य अधिकारी मनपा