रेल्वेने दिला झटका! आजपासून AC ते स्लीपर क्लासचा प्रवास होणार महाग, जाणून घ्या नवीन दर

Published on -

भारतीय रेल्वेने आज 1 जुलै 2025 पासून तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. देशातील कोट्यवधी प्रवाशांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून, एसी ते स्लीपर क्लासपर्यंत सर्वच वर्गातील प्रवाशांना आता थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. जर तुम्ही रेल्वेने नियमित प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, ही भाडेवाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. 30 जूनपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर जुनाच दर लागू राहणार आहे. विशेष म्हणजे, लोकल ट्रेन आणि मासिक सीझन तिकिटांच्या (MST) भाड्यांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, ज्यामुळे लाखो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वेचे नवीन दर

नवीन दरांनुसार, नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेकंड क्लास, स्लीपर आणि फर्स्ट क्लाससाठी दर 1 पैसे प्रति किमीने वाढवण्यात आले आहेत. एसी क्लासमध्ये ही वाढ 2 पैसे प्रति किमी इतकी आहे. उदाहरणार्थ, दिल्ली ते लखनौसारख्या (550 किमी) प्रवासात नॉन-एसी प्रवाशाला ₹5 आणि एसी 3-टायर प्रवाशाला ₹11 अतिरिक्त भरावे लागतील. तर दिल्ली ते मुंबई (1400 किमी) प्रवासासाठी भाडेवाढ अनुक्रमे ₹14 आणि ₹28 इतकी आहे.

‘या’ गाड्यांचे दर वाढणार

याशिवाय, 501 ते 1500 किमी प्रवासासाठी सरासरी ₹5, 1501 ते 2500 किमीसाठी ₹10 आणि 2501 ते 3000 किमी पर्यंत ₹15 पर्यंत अधिक भाडे आकारले जाईल. ही दरवाढ राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस, हमसफर, दुरांतो, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस, एसी विस्टाडोम आणि अनुभूती कोच अशा सर्व प्रीमियम गाड्यांवर लागू होणार आहे. यामध्ये फक्त मूळ भाडे बदलले जाईल, आरक्षण, सुपरफास्ट शुल्क आणि जीएसटी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

रेल्वे प्रशासनाने भाडेवाढीचं समर्थन करत सांगितलं की, ऑपरेटिंग खर्च आणि प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. माजी रेल्वे बोर्ड सदस्य एम. जमशेद यांच्या मते, या वाढीमुळे दरवर्षी सुमारे ₹1500 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल, जो स्टेशन आणि ट्रेन सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!