भारतामध्ये अभियांत्रिकी म्हटलं की IIT हेच सर्वस्व समजलं जातं. JEE नावाच्या प्रवेश परीक्षेचा तणाव, लाखो विद्यार्थ्यांची स्पर्धा, आणि त्यातून एखाद्या संस्थेत प्रवेश मिळणं म्हणजे मोठंच आव्हान. पण तुम्हाला असं जर कोणी सांगितलं की जगात एक अशी संस्था आहे जिथे JEE लागणार नाही, शिक्षणासाठी फीही द्यावी लागणार नाही आणि तरीही प्लेसमेंटमध्ये ती IIT पेक्षाही वर आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. आणि ही संस्था म्हणजे Technical University of Munich, अर्थात TUM, जर्मनीमधील एक प्रतिष्ठित अभियांत्रिकी विद्यापीठ.
TUM कॉलेज प्रवेश प्रक्रिया

TUM म्हणजे गुणवत्तेचं आणि संशोधनाचं प्रतीक. 1868 साली स्थापन झालेलं हे विद्यापीठ गेली 150 वर्षं जागतिक दर्जाचे अभियंते, संशोधक आणि नवोपक्रम करणारे तयार करत आलं आहे. जर्मनीसारख्या औद्योगिक राष्ट्रात TUM ला “अभियांत्रिकीचं मंदिर” म्हटलं जातं. इथं प्रवेश घेणं म्हणजे जगातल्या सर्वात हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं नाव लिहून घेणं.
सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, TUM मध्ये शिक्षण पूर्णतः मोफत आहे. तुम्ही जर्मन असाल किंवा भारतीय, याचा फरक नाही. केवळ काही सेमिस्टर फी आणि विद्यार्थी संघाच्या शुल्काव्यतिरिक्त कुठलाही मोठा शैक्षणिक खर्च इथे होत नाही. आणि इथं प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला NEET किंवा JEE सारखी कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही. फक्त TOEFL किंवा IELTS सारखी इंग्रजीतली पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि तुमचा शैक्षणिक रेकॉर्ड उत्तम असावा लागतो.
आज TUM चं नाव जागतिक रँकिंगमध्येही वरचं आहे. Times Higher Education च्या यादीत TUM जगात 49 व्या क्रमांकावर आहे आणि संगणकशास्त्रात तर टॉप 10 मध्ये येतं. अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, जीवनशास्त्र, आणि व्यवसायशास्त्र अशा अनेक क्षेत्रात ही संस्था आपली छाप पाडते. आजतागायत TUM च्या 18 माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत, ही गोष्टच त्याच्या दर्जाचा पुरावा आहे.
अभ्यासक्रम
2022-23 या शैक्षणिक वर्षात TUM मध्ये 50,000 हून अधिक विद्यार्थी शिकत होते, यातील 41% विद्यार्थी परदेशातून आलेले होते. ही संस्था 180 पेक्षा जास्त अभ्यासक्रम ऑफर करते, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या आवडीचा अभ्यासक्रम इथे मिळू शकतो. अभियांत्रिकीच्या विविध शाखा, संगणकशास्त्र, जीवनविज्ञान, व्यवस्थापन, इकोनॉमिक्स सगळं काही इथं आहे.
प्लेसमेंट
प्लेसमेंटबाबतही TUM आपली जागतिक ओळख ठामपणे सिद्ध करते. Google, Microsoft, BMW, Siemens, Bosch यांसारख्या नामांकित कंपन्या इथून अभियंते भरती करतात. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यानच इंटर्नशिप मिळते आणि पदवी घेतल्यावर लगेचच चांगल्या नोकऱ्यांची संधी प्राप्त होते.
TUM चे 6 कॅम्पस संपूर्ण जर्मनीभर आहेत, आणि त्याचा आंतरराष्ट्रीय नेटवर्कही मजबूत आहे. त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही, तर जागतिक स्तरावर उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळते. इथं केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर प्रत्यक्ष प्रकल्पांवर, संशोधनावर आणि नवोपक्रमावर भर दिला जातो.