क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा चेंडू हवेत झेपावतो आणि सीमारेषेच्या पलीकडे जातो, तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष काही वेगळाच असतो. या षटकारांमध्ये केवळ धावा नसतात, तर एका फलंदाजाचा आत्मविश्वास, ताकद आणि कौशल्य सामावलेले असते. आज आपण अशा टॉप 5 फलंदाजांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारत स्वतःला “सिक्सर किंग” म्हणून सिद्ध केलं आहे.

रोहित शर्मा
या यादीत प्रथम क्रमांकावर आहे भारताचा कर्णधार रोहित शर्मा. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. आजपर्यंत त्याने 499 सामने खेळत 637 षटकार फटकारले आहेत. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही, तो अजूनही एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय आहे.
ख्रिस गेल
दुसऱ्या क्रमांकावर आहेत वेस्ट इंडिजचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल. क्रिकेटमधील त्याचा अंदाज, स्टाईल आणि पॉवर हिटिंग ही वेगळीच गोष्ट आहे. त्याने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 553 षटकार ठोकले आहेत. गेलने मैदानावर कायमच असा धडाका दिला की, गोलंदाजांच्या चेहऱ्यावर भीती उमटल्याशिवाय राहिली नाही.
शाहिद आफ्रिदी
तिसऱ्या स्थानावर आहे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी. ‘बूम बूम आफ्रिदी’ अशी ओळख असलेल्या या स्फोटक फलंदाजाने 524 सामन्यांत 476 षटकार मारले. आफ्रिदीचा खेळात येण्याचा अंदाज आणि क्षणात सामना बदलण्याची क्षमता त्याला या यादीत स्थान मिळवून देते.
ब्रेंडन मॅक्युलम
चौथ्या स्थानी आहे न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम. आज इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक असलेला मॅक्युलम, एकेकाळी षटकारांच्या पावसाने मैदान गाजवायचा. 432 सामन्यांमध्ये त्याने 398 षटकारांची नोंद केली आहे. त्याचा आक्रमक खेळाचा अंदाज आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
मार्टिन गुप्टिल
पाचव्या स्थानावर आहे आणखी एक न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टिल. त्याने 2009 ते 2022 या काळात 367 सामन्यांमध्ये 383 षटकार मारत स्वतःला सिक्सर स्पेशालिस्ट म्हणून सिध्द केलं.