Ahilyanagar News: राहुरी- देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन महाविकास आघाडी शासन कालखंडात लाभले. केवळ शिक्षण विचारत मला पहिल्याच टर्मला आमदाराचे नामदार करण्यात शरद पवार यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असून आगामी काळातही पवार यांच्या मार्गदर्शनात राजकारणात कार्यरत राहणार असल्याचा खुलासा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला.
पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण
राहुरी येथील आपल्या कार्यालयात माजी मंत्री तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, डॉ. तनपुरे कारखान्यामध्ये सभासदांनी मोठ्या विश्वासाने मतदान केले. सहकार क्षेत्रामध्येसभापती अरुण तनपुरे यांचे पारदर्शक कामकाज तसेच बाजार समितीचा आदर्शवत कारभार पाहता सभासदांनी तनपुरे गटाला मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले.

कारखाना सुरू करण्यासाठी अरुण तनपुरेंचा पक्षप्रवेश
पूर्वी कारखान्याचे संचालक अत्यल्प मताने निवडून येत होते. परंतू यंदा २ ते ३ हजाराच्या फरकाने २१-० ची सत्ता मिळाली. सद्यस्थितीला राज्यामध्ये केवळ सत्ताधारी कारखान्यांनाच शासन मदत करीत आहे. शासन सत्तेत सहभागी असलेल्या सत्ताधाऱ्यांनाच शासकीय कर्ज, एनसीडिसीचे कर्ज मिळाले. श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, शिरूरचे माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या कारखान्यांना कर्ज नाकारले गेले होते. त्यामुळे तनपुरे कारखाना सुरू होण्यासाठी सत्तेत असणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांसह कारखान्याचे सर्व संचालक व कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झाले आहे. विरोधी पक्षातून अरुण तनपुरे व समर्थकांनी सत्ताधारी गटात प्रवेश केला आहे.
आगामी काळातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबतच राहणार
महाविकास आघाडी सत्ता काळात केवळ शिक्षण विचारत शरद पवार यांनी ६ खात्याचे राज्यमंत्री पद दिले. परिणामी मागील कालखंडात कोट्यवधी रुपयांचा निधी राहुरी मतदार संघाला मिळाला. कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी फळबागा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. आयटी पार्क उभारणी, शेतकऱ्यांना पाठबळ तसेच उद्योग व्यवसायाला बळकटी देण्याचे काम पवार यांनी केलेले आहे. राज्यात व राहुरी मतदार संघात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे शरद पवार यांच्या पाठबळाने मी महाविकास आघाडी शासन काळात केले. त्यामुळे आगामी काळातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबतच राहणार असल्याचा खुलासा तनपुरे यांनी केला.