Ahilyanagar News: पुणतांबा- येथील गावाला पाणीपुरवठा करणारी तळ्याजवळील पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणतांबेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरलेली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीटंचाई
यापुर्वी गावाला ४ ते ५ दिवसाआड प्रत्येक प्रभागामध्ये ग्रामपंचायती मार्फत पाणीपुरवठा केला जात होता. परंतु तळ्याजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रभागांमध्ये नळाला पाणी न सोडल्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणतांबेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

विकतचे पाणी घेण्याची वेळ
गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी विकतचे लहान -मोठे पाणी टँकरद्वारे घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नळाद्वारे येणारे पाणी अशुद्ध असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विकतचे जार घ्यावे लागत आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी आर्थिक झळ सहन करावी लागत असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करण्याची मागणी
मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी फुटलेली तळ्याजवळील पाईपलाईन सोमवारी दुरुस्त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आठ ते दहा दिवसानंतर काही प्रभागांमध्ये पाणी सोडण्यात आले. पुढील काळामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही व विकतच्या पाण्यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.