आपण रोज घर साफसफाई करत असतो, पण झाडूसारख्या अत्यंत सामान्य वस्तूकडे आपण कधी विशेष लक्ष देतो का? बहुतेक वेळा नाही. पण वास्तुशास्त्र सांगतं की, घरात झाडू कुठे, कसा आणि कधी ठेवतो हे इतकं महत्त्वाचं ठरू शकतं की ते आपल्या घरात लक्ष्मीचा वास ठेवू शकतं किंवा दुर्भाग्यही ओढवू शकतं.

संध्याकाळी झाडू मारू नये
झाडू ही केवळ साफसफाईची वस्तू नाही, ती देवी लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. पुराणांमध्येही झाडूबाबत अनेक कथा सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला त्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजून देतात. विशेषतः संध्याकाळी झाडू न मारण्याची ताकीद आपल्याला लहानपणापासून ऐकवली जाते, कारण असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी झाडू मारल्यास देवी लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते. त्यामुळे झाडू नेहमी सकाळी वापरणं शुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार झाडू कुठे ठेवायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोक झाडू सहजपणे जेवणाच्या खोलीत, बाल्कनीत किंवा अगदी छतावरही ठेवतात. पण हे प्रकार वास्तुशास्त्राच्या दृष्टीने नकारात्मक परिणाम करणारे मानले जातात. उदाहरणार्थ, स्वयंपाकघर किंवा जेवणाच्या ठिकाणी झाडू ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण अन्नाशी निगडित जागा ही सात्विक उर्जेची जागा असते आणि अशा ठिकाणी झाडूसारख्या वस्तूचा अस्वच्छ स्पर्श आर्थिक अडचणी आणू शकतो.
झाडू कुठे ठेवू नये?
झाडू कुठे ठेवू नये याविषयी एक महत्त्वाचा नियम म्हणजे ईशान्य कोपरा, म्हणजेच घराचा देवघराशी संबंधित पवित्र भाग. जर तुम्ही तिथे झाडू ठेवला, तर समजावं की त्या जागेतील सकारात्मक ऊर्जा क्षीण होऊ शकते. याउलट, झाडू ठेवण्यासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे नैऋत्य दिशा घराचा दक्षिण-पश्चिम भाग. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते आणि दुर्भाग्य दूर राहतं.
झाडू ठेवतानाही काही लहानशा गोष्टींचा विचार केला पाहिजे. तो नेहमी जमिनीवर झुकवून ठेवावा, आणि जर उभा ठेवला तर त्याचा झाडण्याचा भाग वरच्या दिशेने असावा. विरुद्ध पद्धतीने झाडू ठेवला तर ती ऊर्जा तुटक, अस्थिर होऊन घरावर नकारात्मक परिणाम करू शकते.