क्षेत्र कोणतंही असो, आता तुम्हीही बनू शकता NASA चा भाग; नासामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अंतराळ संस्थेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आता नासामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अनेकांच्या मनात असा गैरसमज असतो की नासा म्हणजे फक्त अवकाश वैज्ञानिक आणि अत्युच्च शिक्षण घेतलेल्यांची जागा, पण आता परिस्थिती हळूहळू बदलते आहे. या संस्थेमध्ये आता विविध क्षेत्रांतील तरुणांना सामावून घेतलं जात आहे आणि त्यामुळे नासा हे स्वप्न फक्त काही मोजक्या लोकांसाठी मर्यादित राहिलेलं नाही.

‘या’ पदांसाठी भरती

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच नासा, ही एक जागतिक पातळीवर ख्यातनाम असलेली अंतराळ संस्था आहे. तिच्या झेंड्याखाली काम करण्याचं स्वप्न जगभरात अनेक तरुण पाहतात. फक्त अमेरिकेपुरतं नव्हे, तर भारतातीलही हजारो तरुण आपलं भविष्य नासामध्ये पाहतात. एक काळ असा होता, जेव्हा नासामध्ये काम करण्याची संधी फक्त शास्त्रज्ञ, अभियंते किंवा आयआयटीसारख्या संस्थांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळते, असा समज होता. पण आता ही संधी प्रशासन, संगणक शास्त्र, डेटा सायन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मानव संसाधन आणि कम्युनिकेशनसारख्या विविध विभागातील उमेदवारांसाठीही खुली झाली आहे.

अर्ज कसा आणि कुठे कराल?

जर एखाद्या तरुणाला नासामध्ये काम करायचं असेल, तर त्यांनी USAJOBS.gov या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी. ही वेबसाईट अमेरिकन सरकारच्या नोकऱ्यांसाठीचं अधिकृत केंद्र आहे आणि त्यावर नासामधील प्रत्येक रिक्त पदाची सविस्तर माहिती दिलेली असते. या पोर्टलवर आपलं वैयक्तिक खाते तयार करून, उमेदवार आपला बायोडाटा अपलोड करू शकतो. हे विशेष आहे की या पोर्टलवर एकावेळी 5 वेगवेगळ्या प्रकारचे रिज्युम अपलोड करण्याची मुभा असते, म्हणजेच उमेदवार आपल्या विविध कौशल्यांनुसार अनेक विभागात अर्ज करू शकतो.

अर्ज करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया इंटरनेटवरून पार पडते आणि ती पारदर्शकपणे हाताळली जाते. तुम्ही एकदा तुमचा बायोडाटा अपलोड केला की, त्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार आणि अनुभवाच्या आधारावर संबंधित पदासाठी अर्ज करता येतो. जर तुमचा अर्ज निवडला गेला, तर नासाकडून थेट संपर्क केला जातो आणि पुढील मुलाखतीसाठी आमंत्रण दिलं जातं.

नासामध्ये काम करणं ही केवळ एक नोकरी नाही, तर ती एक जबाबदारी आणि सन्मान असतो. केवळ अवकाश संशोधनातच नव्हे, तर मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात योगदान देण्याची संधी इथे मिळते. म्हणूनच नासा ही संस्था आजच्या तरुणांसाठी केवळ स्वप्नरंजन नव्हे, तर वास्तवात उतरवता येईल अशी प्रेरणादायी जागा बनली आहे.