भारतीय क्रिकेट संघाचा नियोजित बांगलादेश दौरा सध्या अनिश्चिततेच्या छायेत आहे. खेळाच्या मैदानापेक्षा राजकीय घडामोडी सध्या या दौऱ्यावर जास्त प्रभाव टाकत आहेत. ऑगस्टमध्ये होणाऱ्या या मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तयार असलं तरी, अंतिम निर्णय भारत सरकारच्या सल्ल्यानंतरच घेतला जाणार आहे. कारण बांगलादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती काहीशी अस्थिर आणि संवेदनशील बनली आहे.

सामन्याचे वेळापत्रक
बांगलादेशने भारताला तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी निमंत्रण दिलं असून, 17 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार होती. मात्र, शेख हसीना यांचं सरकार विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे कोसळल्याने आणि अंतरिम सरकार स्थापन झाल्याने दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे, भारतीय संघाचा दौरा खेळाच्या अंगाने जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो राजकीय पातळीवरही संवेदनशील ठरतो आहे.
भारताला आता चिंता आहे ती तिथल्या बदललेल्या परिस्थितीची आणि खेळाडूंच्या सुरक्षेची. बांगलादेशात घडत असलेल्या राजकीय उलथापालथी, हिंदूंवरील वाढते हल्ले आणि चीनचा वाढता प्रभाव या सगळ्यामुळे भारत सरकार अत्यंत सावध पवित्रा घेत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांचे रिपोर्ट आणि परराष्ट्र मंत्रालयाची शिफारस आल्याशिवाय बीसीसीआय कोणताही निर्णय घेणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने काय म्हटलं?
या दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की त्यांची बीसीसीआयशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, जर ऑगस्टमध्ये ही मालिका पार पडली नाही, तरी येत्या काही आठवड्यांत ती पुनर्नियोजित करता येईल. त्यांनी सांगितलं की, वेळापत्रक केवळ बीसीसीआयच्या मान्यतेनंतरच जाहीर केलं जाईल.
त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या मालिकेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खेळाडूंची सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध याचा विचार करता आता भारत बांगलादेश दौऱ्यावर जाईल का? याबाबत सस्पेन्सच निर्माण झालाय.