पावसाळा सुरू झाला की डासांचा हैदोस वाढतो. घरात लहान मुलं असोत, वयोवृद्ध असोत किंवा कामाने थकलेली माणसं, डासांच्या चावण्यामुळे सगळ्यांची झोप उडते. बाजारात मिळणाऱ्या रासायनिक कॉईल्स, स्प्रे किंवा मशीन यांचा वापर करायचा म्हटला की, अनेकदा त्यांचे दुष्परिणामही जाणवतात. अशा वेळी, जर तुमच्या स्वयंपाकघरातच एक असा उपाय उपलब्ध असेल, जो डासांना दूर ठेवेल आणि तुमच्या आरोग्यालाही धक्का पोहोचणार नाही, तर त्याहून चांगली गोष्ट कोणती?

हा उपाय अगदी सोप्पा आणि स्वस्त आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक कांदा लागेल. कांदा हा आपल्या स्वयंपाकात रोज वापरला जातो, पण त्याचा वापर डासांपासून सुटका मिळवण्यासाठीही करता येतो, हे फार कमी लोकांना माहीत असतं. कांद्यामध्ये असणाऱ्या सल्फरयुक्त संयुगांमुळे त्याचा वास डासांना बिलकुल सहन होत नाही. हा वास त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतो आणि त्यामुळे ते त्या जागेपासून लांब पळतात.
कांद्याचा उपाय
कांद्याचा उपयोग करण्याचे काही साधे घरगुती मार्ग आहेत. एक म्हणजे कांद्याचे लहान तुकडे करून ते घराच्या कोपऱ्यात, खिडकीजवळ, दाराजवळ ठेवा. रात्रभर तेथे ठेवल्यास डासांची वर्दळ जाणवणार नाही. दुसरा मार्ग म्हणजे कांदा किसून त्याचा रस काढणे.
हा रस एका स्प्रे बाटलीत भरून घराच्या कोपऱ्यांमध्ये, पडद्यांवर किंवा बेडच्या भोवती फवारणी केली तर तो वास डासांना अजिबात सहन होत नाही. तुम्ही हाच कांदा पाण्यात टाकून रात्रभर भिजत ठेवलात, आणि सकाळी त्या पाण्याने घरातील फरशी पुसलीत, तरी त्याचा प्रभाव पडतो.
नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय
या उपायात सगळ्यात खास गोष्ट म्हणजे कोणताही रासायनिक पदार्थ वापरला जात नाही. लहान मुलं, वृद्ध मंडळी किंवा ज्यांना अॅलर्जी आहे, अशांसाठी हा उपाय एकदम सुरक्षित आहे. शिवाय कांद्याचा वास हवा शुद्ध करतो, हवेतले सूक्ष्म जंतू आणि कीटकांनाही दूर ठेवतो. ही एक अशी नैसर्गिक पद्धत आहे, जी पर्यावरणालाही त्रास न देता आपल्याला संरक्षण देते.