अहिल्यानगर : काही दिवसांपासून अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने ते अनेकदा बोलत देखील आहेत, मात्र यामुळे त्यांना अज्ञात व्यक्तीने ‘दोन दिवसांत तुम्हाला जिवे मारून टाकू’ अशी धमकी दिली आहे.
तसा मेसेज आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर बुधवारी दुपारी आला होता. याप्रकरणी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास साहेबराव शिरसाठ (रा. जहागिरदार चाळ, बुरूडगाव) यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, बुधवारी दुपारी मार्केट यार्डजवळील महात्मा फुले चौकात असताना एका मोबाईल क्रमांकावरून टेक्स मेसेज आला.
त्यात म्हटले आहे की, आमदार संग्राम जगताप यांना दोन दिवसांत जिवे मारून टाकू, असा मजकूर होता. यासंदर्भात सुहास शिरसाठ यांनी रितसर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावरुन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार अमिना शेख करीत आहेत.
कोतवाली पोलिसांनी तत्काळ त्या मोबाईल क्रमांकाचा शोध सुरू केला. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे चर्चा शहरात सुरू आहे. मात्र यामुळे आता शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.