अहिल्यानगर शहरात उभ्या राहणाऱ्या नाट्य संकुलासाठी १३ कोटींच्या निधींची गरज, नाट्य संकुलात ‘या’ असणार आहेत खास सुविधा

Published on -

अहिल्यानगर- शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्य संकुलाचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने नाट्य संकुलाचे काम आता ७५ टक्के पूर्ण झाले असून, अंतर्गत कामकाज बाकी आहे. यासाठी स्वतंत्र निविदा तयार करण्यात आली असून सुमारे १३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. अंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यात नाट्य संकुलाचा पडदा उघडण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर शहराला नाट्य, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. अहिल्यानगर शहरातील अनेक कलावंतांनी अभिनय क्षेत्रात नावलौकिक कमविला आहे. आजही शहरात राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा होतात. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळातो. तसेच, विविध नाटकांचे प्रयोगही शहरात होतात. परंतु, महापालिकेचे हक्काचे नाट्यगृह नाही. जिल्हा बँकेचे यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, तलाठी संघटनेचे माऊली संकुल अशी दोन मोठी सभागृहे वगळता शहरात मोठे नाट्यसंकुल नाही. नाट्यप्रेमींना सरावासाठी हक्काचे संकुल उपलब्ध होत नाही.

त्यामुळे शहरात हक्काचे नाट्य संकुल असावे अशी नगरकरांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील नगररचना योजना चार अंतिम भूखंड १२९ वर नाट्यसंकुल उभारण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीला या प्रकल्पाची १२.४७ कोटी किंमत होती. तर, स्थापत्य कामाची किंमत ७ कोटी २२ लाख होती. सुरुवातीला ५०० आसन क्षमतेचे नाट्यसंकुल उभारण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर जास्तीत जास्त आसन क्षमतेचे बनवावे अशी मागणी होऊ लागल्याने पुन्हा ५०० आसनांची क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे आता एकूण १००० आसन क्षमतेचे नाट्यगृह उभे राहत आहे.

२३ मार्च २०१० रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तेव्हापासून काम सुरू झाले असून, अद्यापि काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत महाराष्ट्र शासन ६० लाख, महापालिका फंड ३ कोटी १५ लाख व आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून जिल्हा नियोजन समितीद्वारे ५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. एकूण ८ कोटी ७५ लाखांचा निधी नाट्यसंकुलासाठी मिळाला आहे. सध्या सुमारे पाच कोटी खर्च झाले असून, त्यात निधीतून नाट्य संकुलाचे सिव्हिल वर्क जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे संकुलाचे एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दरम्यानच्या, काळामध्ये ठेकेदाराने नाट्य संकुलाचे काम थांबविले होते. आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन ठेकेदाराची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले. त्यामुळे काम वेगाने सुरू झाले. सिव्हील वर्कचे येत्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची
शक्यता असून, अन्य काम चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी २०२६ नंतर नाट्य संकुलाचा पडदा उघडण्याची शक्यता आहे.
नाट्यसंकुलाचे सिव्हील वर्कचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आता अंतर्गत आसन व्यवस्था, इलेक्ट्रिक, ध्वनी क्षेपक व्यवस्था यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

नाट्य संकुलातील सुविधा

तळमजल्यामध्ये १० बाय २० मीटर आकर्षक वुडन प्लोरिंग, स्टेज प्रशस्त बॅकस्टेज, ग्रीन रूम, ॲकोस्टिक इंटेरिअर, कॅफेटेरिया, पार्किंग १०५८ चौरस मीटर, तळमजला ३०२५.१३ चौरस मीटर, पहिला मजला १८५०.४६ चौरस मीटर, प्रशस्त पार्किंगसह तळमजला व बाल्कनी फ्लोअर संपूर्ण वातानुकुलित आसन व्यवस्था
क्षमता : १०० खुर्च्या

नाट्य संकुलाचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झाले आहे. सिव्हील वर्क पूर्ण होत आले असून, अंतर्गत कामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत नाट्य संकुलाचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!