भंडारदरा- तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचे तांडव सुरू असून त्यामुळे भंडारदरा धरणाचा जलसाठा ७ टीएमसीच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे निळवंडे धरणामध्येही नव्या पाण्याची जोरदार आवक होत असून ते ५३.१८ टक्क्यांपर्यंत भरले आहे.
अहिल्यानगर परिसरातील घाटघर येथे मागील २४ तासांमध्ये १४० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, रतनवाडीला १२९ मिमी, पांजरेला ९५ मिमी तर वाकी येथे ५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा परिसरात एकूण ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धुक्यामुळे आदिवासी भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

अनेक गावांमध्ये जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. थंडीमुळे आदिवासी बांधवांच्या घराघरात शेकोट्या पेटल्या आहेत. रतनगडावरही जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदी भरभरून वाहत असून, धरणामध्ये नव्या पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७ हजार ३७ दलघफू (७.०३ टीएमसी) इतका झाला असून, हे धरण ६३.७६ टक्के भरले आहे. याच कालावधीत निळवंडे धरणाचा जलसाठा ४,४२८ दलघफू (४.४२ टीएमसी) इतका नोंदवला गेला असून, ते ५३.१८ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणाच्या वीज निर्माण केंद्रामधून ८५० क्यूसेक्सने विसर्ग सुरु आहे.