अहिल्यानगर- शहरातील माजी खासदार दादा पाटील शेळके बाजार समितीतील भुसार मार्केटमधील आठ दुकाने बुधवारी पहाटे चोरांनी फोडली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. दुकानाचे शर्टर उचकटून चोरांनी आतप्रवेश करीत रोकड लंपास केली. दरम्यान, तीन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, बाजार समितीत सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची गस्त असताना दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पुशखाद्य दुकानदार संजय चुनिलाल लुनिया (रा. आनंदधामजवळ अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, बुधवारी सकाळी दुकानातील काम कामगार विकास आमले दुकानात आले तेव्हा दुकानाचे शर्टर उचकटलेले दिसले. त्यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली असता तत्काळ दुकानात आलो. तर, माझ्या दुकानासह शेजारील माणकचंद उत्तमचंद भंडारी, विजय भागवत कोंथिबिरे, प्रितेश जयकुमार पुंगलिया, नितीन शांतिलाल कटारिया, विजय शांतिलाल कटारिया, प्रशांत अर्जुन सोलाट, सुमित प्रकाश कटारिया यांचीही दुकान फोडलेली दिसली.

नवकार ट्रेडर्स या पशुखाद्याच्या दुकानातून चोरट्यांनी ६ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. इतर व्यापाऱ्यांच्या दुकानांतून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, उशिरापर्यंत जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.
घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलिस उपनिरीक्षक दशरथ पडवळ, पोलिस अंमलदार रोहिणी दरंदले, कविता साठे, प्रज्ञा सरगड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाचे सहायक फौजदार रवी वीरकर हेही घटनास्थळी दाखल झाले.
श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात तीन चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, बाजार समितीमध्ये हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी आहे. पोलिसांची गस्त असूनही चोरांनी डाव साधला.
१०-१२ वर्षातील पहिलीच घटना
बाजार समितीतील दुकाने फोडल्याची ही दहा ते बारा वर्षातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, आठ दुकाने फोडल्याने मोठ्या प्रमाणात रोकड चोरीला गेली असल्याचे बोलले जात आहे. सध्या एकाच व्यापाऱ्याने फिर्याद दिली असून, अन्य व्यापारीही तक्रारी देणार आहेत.
बाजार समितीचे मुख्य गेट बंद असते मात्र, भाजीपाला मार्केटकडील गेट उसाच्या ट्रॅक्टर येण्यासाठी सुरू असते. तेथे सुरक्षा रक्षकही असता पण, पहाटेची वेळ साधून चोरांनी संधी साधली. आता आम्ही सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविणार आहोत.
– अभय भिसे, सचिव, बाजार समिती, अहिल्यानगर