Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा या अनुषंगाने शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाजी ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मार्गांचा महा मेट्रो कडून विस्तारही केला जाणार आहे.
तर दुसरीकडे शहराचा मध्यवर्ती भाग हिंजवडी सोबत मेट्रो मार्गाने कनेक्ट करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात असून या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण करण्यात आले आहे.

यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये इतरही अनेक मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील काही मेट्रो मार्गांना सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे तर काही मेट्रो मार्ग प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोणते नवे मेट्रो मार्ग विकसित होणार आणि त्या प्रकल्पांची सध्याची स्थिती काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पुण्यात विकसित होणार हे नवे मेट्रो मार्ग
हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्ग : या मेट्रो मार्गाला मेट्रो मार्ग 3 म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचे 83 टक्के काम पूर्ण झाले असून याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पूर्ण केले जात आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर विकसित केला जातोय.
पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी : पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्ग 1 चा (Purple Line) विस्तारित मार्ग म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी. या प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून सध्या हा मार्ग अंडर कन्स्ट्रक्शन आहे.
स्वारगेट ते कात्रज : पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्ग 1 चा आणखी एक विस्तारित मार्ग म्हणजे स्वारगेट ते कात्रज. या प्रकल्पासाठी सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या निविदा 5 जुलै 2025 रोजी उघडल्या जाणार आहेत.
रामवाडी ते वाघोली : वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्ग 2 चा विस्तारित मार्ग म्हणजेच रामवाडी ते वाघोली. रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रोमार्ग प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली असून लवकरच या मार्गासाठी टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे.
वनाज ते चांदणी चौक : वनाज ते चांदणी चौक हा देखील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्ग 2 चा विस्तारित टप्पा आहे. या मेट्रो मार्गाला देखील नुकतीच मंजुरी मिळाली आहे आणि लवकरच टेंडर प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे.
खराडी – हडपसर – स्वारगेट – खडकवासला : खराडी – हडपसर – स्वारगेट – खडकवासला मेट्रो मार्ग 4 म्हणून ओळखला जातोय. या प्रस्तावित मेट्रो मार्गाला अजून पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड म्हणजेच पीआयबी कडून आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मंजुरी मिळणे बाकी आहे.
एसएनडीटी – वारजे – माणिक बाग : एसएनडीटी – वारजे – माणिक बाग मेट्रो मार्गाला मेट्रो मार्ग 5 म्हणून ओळखले जात आहे. हा प्रकल्प देखील पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.
हडपसर – लोणी काळभोर : या मेट्रो मार्गाला मेट्रो मार्ग 6 म्हणून ओळखले जाते. या प्रस्तावित मेट्रो मार्गाला पीएमसी, राज्य आणि केंद्राची मंजुरी मिळणे बाकी आहे.
हडपसर – सासवड रोड रेल्वे स्टेशन : हा मेट्रो मार्ग सहा अजूनही पीएमसी, राज्य आणि केंद्राच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
स्पुर लाईन टु पुणे लोहेगाव एअरपोर्ट – या प्रस्तावित मेट्रो मार्ग प्रकल्पाचा डीपीआर अजून तयार झालेला नाही. या प्रकल्पासाठीच्या डीपीआरचे काम सध्या स्थितीला सुरु आहे आणि लवकरच यासाठी डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर मग आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.