संगमनेर- व्याजाने दिलेल्या पैशाची रक्कम घेण्यासाठी महिला व तिच्या पतीला त्रास देऊन मोठी रक्कम उकळणाऱ्या नाशिक येथील दोघा खाजगी सावकारांना येथील पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील प्रवीण विलास देशमुख यांनी कंपनीसाठी कैलास बाबुराव मैंद (रा. जेल रोड, नाशिक रोड) यांच्याकडुन त्यांच्याकडे असलेल्या मनी लैंडर लायसन्स कडून दोन टक्के व्याजाने ८ लाख रुपये घेतले होते. त्यांच्याकडून मुद्दल व व्याज न गेल्याने मुद्दल रक्कमेस चक्रवाढ व्याजाप्रमाणे सावकारांनी सुमारे १ कोटी २५ लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम व्याजासह घेतली.

त्यावरच न थांबता पती-पत्नीच्या नावावर असलेली टोयोटा कंपनीची ग्लान्झा गाडी व हयुंडाई कंपनीची टक्सन मॉडेलची कार व्याजापोटी बळजबरीने मालदाड येथील देशमुख यांच्या घरुन बळजबरीने घेवुन गेले होते. आरोपींनी दिलेल्या मुद्दलच्या बदल्यात व्याजापोटी २१ लाख रुपये देण्याकरीता देशमुख यांच्या घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत ज्योती देशमुख यांनी येथील तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी रविंद्र अशोक सोळसे (वय ३१, रा. जयभवानी रोड, नाशिक रोड) व भिमचंद्र ऊर्फ भिम रमेश शिरसाठ (वय ३८, रा. भिमनगर, कामना हौसिंग सोसायटी, नाशिक रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून देशमुख यांची वाहने जप्त केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.