गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, राहुरीत ख्रिश्चन समाज आक्रमक! हजारोंचा मोर्चा

Published on -

राहुरी- आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ राहुरीत ख्रिश्चन समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी जोपर्यंत आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे राहणाऱ्या महलेने ६ जून २०२५ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सीआयडी चौकशी व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आत्महत्येनंतर सांगली येथे आयोजित सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंविरोधात अत्यंत अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला.

आमदार पडळकर यांनी या सभेत ख्रिस्ती धर्मगुरूंवर थेट जीवे मारण्याची धमकी देत, त्यांना मारणाऱ्याला आर्थिक बक्षीस जाहीर केल्याचा आरोप आहे. अशा प्रकारची सार्वजनिक वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी आणि हिंसेला प्रवृत्त करणारी असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते.
ख्रिश्चन समाजाच्या वतीने २ जुलै २०२५ रोजी राहुरी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला आणि तेथे तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष संतोष चोळके, राजुभाऊ आढाव, ॲड. डॅनियल ताकवले, गुड्डूभाऊ निकाळजे, आशिष शिंदे, मंगेश साळवे, डॉ. प्रवीणराजे शिंदे, शमुवेल साळवे, मेघाताई गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी राहुरी पोलिस ठाण्याजवळ ठिय्या आंदोलन केले. या वेळी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढली व कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या आंदोलनात फादर संपत भोसले, मैन्युएल गायकवाड, सतीश नन्नवरे, प्रदीप हिवाळे, सुनील शिंदे, सुरेश पंडित, मोजेस सरोदे, रमेश पवार, राजू कसबे, अशोक त्रिभुवन, अविनाश सरोदे, विजय सरोदे, गोरख दिवे, निलेश पाटील, नितीन गायकवाड, सायमन ब्राम्हणे, संजय खोतकर, दीपक शेळके, पिंटूनाना साळवे, सुनील चांदणे यांसह अनेक ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!