श्रीरामपूर : येथील शहर पोलिसांनी गोंधवणी परिसरात छापा टाकून बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. यावेळी १ लाख ६६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई संपत ज्ञानदेव बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोसीन इक्बाल सय्यद, (वय २४, रा. संजयनगर वाणी, टाकीजवळ, मुळ रा. शांतीनगर रेमंड शोरुम जवळ, उल्लासनगर जि. ठाणे), अरबाज अनिस मलंग (वय २५, रा. गुलशन चौक, जवळ वॉर्ड २, श्रीरामपूर), अन्वर शब्बीर शहा (वय ४७, रा. संजयनगर, डावखर मैदान, बर्फ कारखान्याजवळ वॉर्ड नंबर १), स्पिरीट विकणारे प्रमोद बाळासाहेब फुलारे व राहुल बाळासाहेब फुलारे, बाटलीचे बुच बनविणारा अण्णा (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह जागा मालक एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. १) दुपारी पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक महिलेच्या मालकीच्या घरामध्ये बनावट देशी दारु बनवत आहेत, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सोळंके यांनी पोलीस पथकासह गोंधवणी येथे पाहणी केली. तेव्हा तेथे तीन इसम बनावट देशी भिंगरी, संत्रा दारु तयार करुन बाटल्यामध्ये भरुन सिल व लेबल लावताना मिळुन आले.
या कारवाईत बनावट देशी दारुच्या सिलबंद बाटल्या, हाताने बॉटल सिल करण्याचे लोखंडी छोटे मशिनसह हाताने बॅच नंबर टाकण्याचे छोटे मशिन, कंपनीचा रब्बर टॅम्पचा लाल बॉक्स, लाल चिकट टेप, अर्धा लिटर इसेस केमिकल, संत्रा फ्लेवर असलेली अर्धी भरलेली बॉटलसह दोन गोण्यामध्ये भरलेल्या देशी दारु भिंगरी, संत्राचे लेबल, होन्डा ॲक्टीवा मोपेड गाडी, असा बनावट दारु वाहतुक
करण्याकरीता प्लॉस्टिकची एक बकेट, असा एकुण १ लाख ६६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.