अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार काशिनाथ दाते यांनी अधिवेशनात उठवला आवाज

Published on -

पारनेर- पारनेर-नगर मतदारसंघातील सुप्यापासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत दि. २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले होते. यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. काशिनाथ दाते यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अंतर्गत प्रस्ताव मांडत शासनाचे लक्ष वेधले.

महापुरामुळे अनेक गावांमध्ये नागरिक अडकून पडले होते. आ. दाते यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन स्थानिक धाडसी नागरिकांची मदत व प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, जलसाठे, रस्ते व शेतजमीनीचे नुकसान होऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक नुकसान झाल्याचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय तत्परतेने दुसऱ्याच दिवशी महापूरग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी अहवाल व झालेल्या नुकसानीची आकडेवारीही सादर केली असून, परीस्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक असलेल्या उपाययोजनांची माहितीही शासनाकडे पाठवण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना आ. दाते म्हणाले की, ‘शहरांमधील मेट्रो, रस्ते आदी निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारे चालना दिली जाते, त्याच प्रकारे ग्रामीण विकासालादेखील चालना देणे आवश्यक आहे. वेगवेगळे महामार्ग बनवताना त्या महामार्गांना जोडल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व निर्मितीवरही भर देणे आवश्यक आहे, ज्यामुळे शहर व ग्रामीण विकासात तफावत निर्माण होणार नाही. ग्रामीण व शहरी अशा दोनही भागांचा समतोल विकास साधण आवश्यक आहे.

एकंदरीत या प्रस्तावाच्या माध्यमातून आ. दाते यांनी पारनेर-नगर मतदारसंघासह संपूर्ण ग्रामीण भागातील समस्या, अडचणी आणि विकासासाठी आवश्यक उपाययोजनांकडे शासनाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि आपत्तीग्रस्त भागाच्या व्यवस्थापनासाठी ठोस आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी या माध्यमातून सरकारला केले आहे.

अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील शेतीसह, रस्ते पूल, सी.डी. वर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री विखे यांनी तत्परतेने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रचंड नुकसान झालेली आहे, शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाची शासनाने दखल घ्यावी.
आ. काशिनाथ दाते (विधानसभा सदस्य).

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!