clean brass utensils, clean copper vessels, home cleaning tips, remove black stains from utensils, lemon and salt for cleaning, tamarind cleaning method
घरामध्ये ठेवलेली तांब्याची आणि पितळीची भांडी ही केवळ उपयोगीच नाहीत, तर आपल्या सांस्कृतिक परंपरेचंही एक जिवंत प्रतीक असतात. पण वेळेनुसार या भांड्यांवर काळपटपणा चढतो आणि त्यांची चमकही हरवते. कितीही प्रयत्न केला तरी ती जुनी सोन्यासारखी झळाळी परत येत नाही. याकरिता आपण काही घरगुती उपाय या लेखात जाणून घेणार आहोत, जे कमी खर्चात तुमची भांडी सोन्यासारखी चमकवतील.

खरंतर तांबं आणि पितळ ही धातू ऑक्सिडेशनमुळे काळी पडते. जेव्हा ही भांडी हवेतल्या आर्द्रतेशी, स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या आम्लांशी संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या पृष्ठभागावर एक थर बसतो. त्यामुळे ती भांडी काळसर दिसू लागतात. त्यावर कोळशासारखा थर जमा होतो.
अशा वेळी बाजारात मिळणाऱ्या रसायनांचा वापर करणं म्हणजे एकतर खर्चीक, शिवाय आरोग्यासाठीही घातक. यासाठी घरच्या घरी, स्वस्तात आणि नैसर्गिक पद्धतीने काही उपाय तुम्ही करू शकता.
लिंबू
सुरुवात तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या लिंबापासून करू शकता. लिंबाची आंबटता आणि मिठाचा खरडा या दोघांची जोडी म्हणजे तांब्याच्या आणि पितळीच्या भांड्यांसाठी एक रामबाण उपाय. फक्त अर्धा लिंबू घ्या, त्यावर थोडं मीठ शिंपडा आणि काळी झालेली भांडी घासायला सुरुवात करा. सुरुवातीला काहीच फरक न जाणवला, तरी हळूहळू काळेपणा निघू लागतो आणि काही मिनिटांतच भांडी परत तेजस्वी होतात.
चिंच
तुमच्याकडे चिंच असेल, तर तिही तितकीच उपयोगी आहे. गरम पाण्यात थोडी चिंच भिजवा, ती चांगली मऊ होऊ द्या आणि मग ती हाताने चांगली मॅश करून तिच्या पेस्टने भांडी घासून बघा. चिंचेतला आंबटपणा साठलेल्या थरांना सहजपणे साफ करतो. काही वेळातच ती भांडी जणू नव्यानं बाजारातून घेतल्यासारखी दिसायला लागतात.
व्हिनेगर
काही लोक व्हिनेगर वापरणं पसंत करतात. व्हिनेगर, मीठ आणि थोडं गव्हाचं पीठ याचं मिश्रण केलं की एक घट्ट पेस्ट तयार होते. ती भांड्यावर लावून ठेवली आणि थोडा वेळाने घासली, की काळसर थर पूर्ण निघून जातो.
टोमॅटो सॉस
सर्वात शेवटी, एक आश्चर्यजनक उपाय म्हणजे टोमॅटो सॉस किंवा केचप, यामध्ये असलेलं नैसर्गिक आम्ल भांड्याच्या पृष्ठभागावरची झीज सहज दूर करतं. अगदी थोडा केचप लावा आणि काही मिनिटांनी थोडं घासा, भांड्याला नव्यासारखी चमक आल्याचे तुम्हाला दिसून येईल.