आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, UPI नेच जमा करता येईल पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!

Published on -

भारतात बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायला लागणारी रांग आणि वेळेचा अपव्यय या सगळ्यावर आता कायमचा उपाय मिळणार आहे. कारण आता तुम्ही UPI वापरून थेट ATM मधून रोख रक्कमही जमा करू शकाल. अगदी तुम्ही रोज वापरत असलेले Paytm, PhonePe किंवा GPay अ‍ॅप वापरून हे शक्य होणार आहे. डिजिटल व्यवहारात भारताने केलेल्या क्रांतीनंतर आता ही आणखी एक मोठी आणि सोपी पायरी आहे जी सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी घेतली जात आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यासंदर्भात घोषणा केली आहे की, लवकरच देशभरातील अनेक बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) त्यांच्या एटीएममध्ये ही नवी सुविधा सुरू करणार आहेत. यामध्ये कॅश रिसायकलर मशीन (CDM) चा वापर करून ग्राहक थेट UPI अ‍ॅपद्वारे पैसे भरू शकतील. ही प्रणाली इतकी सुलभ असेल की, त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्डचीही गरज भासणार नाही.

कशी असेल नवीन सेवा?

ज्या पद्धतीने ही सेवा काम करेल ती खूपच सुलभ आहे. ATM किंवा CDM मशीनमध्ये ‘UPI कॅश डिपॉझिट’ हा पर्याय निवडला की, एक QR कोड स्क्रीनवर दिसेल. तो तुमच्या फोनवरच्या UPI अ‍ॅपने स्कॅन केल्यानंतर मशीनमध्ये पैसे ठेवायचे. एकदा मशीनने रक्कम ओळखली की, UPI अ‍ॅपमध्ये ती दिसेल. मग फक्त खातं निवडायचं आणि UPI पिन टाकून व्यवहार पूर्ण झाला की लगेचच बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. आणि याचा पुरावा म्हणून एक पावतीही मिळणार आहे.

ही सुविधा केवळ ग्राहकांच्या वेळेची बचत करणारी नाही, तर संपूर्ण बँकिंग प्रणालीसाठी एक स्मार्ट पुढाकार आहे. ज्यांना बँकेच्या कामासाठी वेळ काढणं शक्य होत नाही, ज्यांच्या घराजवळ बँक शाखा नाही, किंवा ज्यांना झटपट व्यवहार करायचा आहे, त्यांच्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे.

भारताचे UPI परदेशातही

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ची सुरुवात 11 एप्रिल 2016 रोजी झाली आणि आज भारतात दर तासाला 2.5 कोटींपेक्षा जास्त व्यवहार UPI द्वारे होत आहेत. NPCI द्वारे चालवली जाणारी ही प्रणाली आज भारताबाहेरही पोहोचली आहे. फ्रान्स, भूतान, श्रीलंका आणि मॉरिशससारख्या देशांमध्ये ती वापरली जाते आणि अजून अनेक देशांशी चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!