जर तुम्ही नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असाल, किंवा पहिल्यांदाच काम करण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्यासाठी केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी आली आहे. सरकारने नुकतीच ‘रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना’ म्हणजेच ELI योजना मंजूर केली असून, या योजनेंतर्गत पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना थेट ₹15,000 पर्यंतची रक्कम मिळणार आहे.

ही योजना 1 जुलै 2025 पासून अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे. तिच्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना रोजगारात आणणं आणि औद्योगिक क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना देणं. लहान-मोठ्या उद्योगांमध्ये नवीन कर्मचारी भरती करण्यास प्रोत्साहन देऊन देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं स्वप्न आहे.
‘रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना’
या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री अर्ज करण्याची गरज नाही. जर एखादा तरुण पहिल्यांदा EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) मध्ये नोंदणी करत असेल, म्हणजेच पहिल्यांदा पगारदार नोकरी करत असेल, तर त्याच्या नावाने ही मदत आपोआप निश्चित होते. आणि हे पैसे दोन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातील. अर्थात, यासाठी खातं PAN कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे.
हे प्रोत्साहन फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही, तर कंपन्यांनाही दिलं जाणार आहे. एखादी कंपनी जर नवीन कर्मचारी घेते आणि त्या कर्मचाऱ्याने किमान 6 महिने तिथं काम केलं, तर सरकार त्या कंपनीला दरमहा ₹3,000 पर्यंतची आर्थिक मदत 2 वर्षांपर्यंत देणार आहे. अशा पद्धतीने दोघांनाही नोकरी करणाऱ्यालाही आणि नोकरी देणाऱ्यालाही फायदेशीर ठरणारी ही योजना आहे.
योजनेचा लाभ कसा घ्याल?
पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर काही अटींचं पालन करणं आवश्यक आहे. उदा. ही योजना फक्त पहिल्यांदाच काम करणाऱ्यांसाठी आहे. म्हणजे, ज्यांनी पूर्वी कधीही EPFO मध्ये नोंदणी केलेली नाही. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांचा पगार ₹1,00,000 पेक्षा अधिक आहे, ते योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
सध्या लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशा वेळी सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरू शकते. यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये आर्थिक स्थैर्य मिळेल, कौशल्य वाढवण्यासाठी नवीन संधी मिळतील आणि पुढील प्रवासाला एक चांगली सुरुवात होईल.