रेल्वे प्रवासावर जाण्याची तयारी करत असताना तुम्ही तिकीट आधीच बुक केलं आहे आणि आता ऐकलं की 1 जुलैपासून भाडं वाढलंय, तर मनात एकच प्रश्न घोंगावत असेल की, ‘‘आता मला वाढीव पैसे भरावे लागणार का?’’ अनेक प्रवाशांनी हाच संभ्रमात टाकणारा प्रश्न सोशल मीडियावर, स्टेशन्सवर आणि रेल्वे हेल्पलाइनवर विचारला. पण आता रेल्वेने अखेर मौन सोडलं असून याबाबत स्पष्टता दिली आहे.

1 जुलै 2025 पासून भारतीय रेल्वेने काही निवडक गाड्यांच्या भाड्यात तसेच प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरांमध्ये वाढ केली आहे. ही वाढ काही भागांत प्रायोगिक स्वरूपात आहे, तर काही ठिकाणी ती कायमस्वरूपी लागू केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली होती, विशेषतः त्यांच्यात ज्यांनी जून महिन्यातच तिकीट बुक केले होते आणि आता जुलैमध्ये प्रवास करणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, ज्यांनी आपली तिकीटं 1 जुलैपूर्वीच बुक केली आहेत, त्यांना या वाढीव भाड्याचा काहीही परिणाम भोगावा लागणार नाही. म्हणजेच, तुम्ही जर जून महिन्यात ऑनलाइन (IRCTC वरून) किंवा स्टेशनच्या तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घेतलं असेल, आणि प्रवास जुलैमध्ये असेल, तरीही तुम्हाला त्या वेळी लागू असलेल्या जुन्या दरानेच प्रवास करता येईल. कुठलाही अतिरिक्त शुल्क किंवा फरक प्रवासादरम्यान मागितला जाणार नाही.
1 जुलैपासून नवीन तिकीटदर
रेल्वे अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की ही सवलत फक्त पूर्वी बुक केलेल्या तिकिटांकरिता आहे. म्हणजेच, 1 जुलै किंवा त्यानंतर जे नवे तिकीट बुक केले जातील, त्यांना मात्र नव्या दरानेच भाडं भरावं लागेल. आणि ही अट ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या बुकिंगसाठी लागू आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान अचानक वाढीव भाड्याची चिंता मिटली असून आधीच नियोजन करून ठेवलेल्या लोकांसाठी ही एक सकारात्मक बातमी आहे. तर ज्या प्रवाशांनी अजून तिकीट घेतलेलं नसेल, त्यांच्यासाठी नवा दर लागू असेल हे लक्षात घ्यायला हवं.