संपूर्ण जगभरात मांसप्रेमींच्या पसंतीचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारात पाहायला मिळतात. कोणी मासे पसंत करतो, कोणी चिकन, तर कोणी मटण. पण तुम्हाला जगात एक असं मांस आहे जे इतकं महाग आहे की त्याची किंमत ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. या मांसाची किंमत केवळ त्याच्या चवेमुळे नाही, तर त्यामागील मेहनत, काळजी आणि उत्पादनाची पद्धत यामुळेही गगनाला भिडते.

वाग्यू बीफ
या सर्वांत महागड्या मांसाचं नाव आहे वाग्यू बीफ. ही सामान्य गाई नसून जपानमध्ये खास प्रकारे वाढवलेल्या गाईंपासून मिळणारे मांस आहे, ज्याला ‘वाग्यू’ म्हणजेच “जपानी गाई” असं म्हणतात. पण वाग्यू बीफचं जे खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यातील अतिशय बारीक आणि मऊ चरबीचं जाळं ज्याला ‘मार्बलिंग’ म्हणतात. ही मार्बलिंग इतकी सुरेख आणि समरसलेली असते की मांस हातात घेतलं तरी ते वितळल्यासारखं वाटतं. हेच वाग्यूच्या मऊपणामागचं खरं रहस्य आहे.
वाग्यू बीफची किंमत
वास्तविक पाहिलं तर वाग्यू बीफ सर्वसामान्य बाजारात सहज उपलब्धही नसतं. याची किंमत भारतीय रुपयांत सुमारे ₹35,000 ते ₹40,000 प्रति किलोपर्यंत पोहोचते. आणि यापेक्षाही महाग ‘कोबे बीफ’ आहे. वाग्यूच्या सर्वात खास आणि दुर्मिळ प्रकारांपैकी एक. हे केवळ जपानमधील ‘ह्योगो प्रीफेक्चर’ मध्ये मिळतं आणि ते फक्त ‘ताजिमा’ जातीच्या गाईंपासूनच तयार केलं जातं. याच्या गुणवत्तेवर इतकी काटेकोर निगराणी असते की प्रत्येक गोष्ट प्रमाणित केली जाते,अगदी प्राण्याच्या वंशावळीसुद्धा.
कोबे बीफचं वैशिष्ट्य
कोबे बीफचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची अतुलनीय नाजूकता आणि जिभेवर वितळून जाणारी चव. आंतरराष्ट्रीय बाजारात कोबे बीफच्या एका पौंडाची किंमत $300 पेक्षा अधिक असते. भारतात ते फारच दुर्मिळ आणि अत्यंत उच्चभ्रू रेस्टॉरंट्समध्येच कधीतरी उपलब्ध असतं.
या मांसाचं उत्पादनसुद्धा एक वेगळंच जग आहे. वाग्यू गाईंबरोबर अगदी लहानपणापासून विशेष वागणूक केली जाते. त्यांना संगीत ऐकवलं जातं, हलकी मालिश केली जाते, तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर बारकाईने लक्ष दिलं जातं. त्यांना दिला जाणारा आहारसुद्धा अत्यंत पोषक आणि नियंत्रित असतो, ज्यामुळे त्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात मार्बलिंग तयार होतं. याच गोष्टीमुळे वाग्यू बीफ आणि त्यातील कोबे बीफ हे जगातील सर्वात महाग आणि प्रतिष्ठेचं मांस मानलं जातं.