अहिल्यानगर- केडगावच्या दुधसागर सोसायटी परिसरात प्लॉटची खरेदी देण्यासाठी विश्वास संपादन करून दोघांनी इसारापोटी १७ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र, इसार घेऊनही प्लॉटची खरेदी दिली नाही. इसाराची रक्कम परत न देता फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२३ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तुकाराम रामदास कोतकर, गणेश पोपट लोंढे दोघे रा. लोंढे मळा केडगाव, सोनेवाडी-अकोळनेर रोड अहिल्यानगर असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुरेश नामदेव लगड (वय ४३, रा. सुशांतनगर, सोनेवाडी रोड, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, डिसेंबर २०२३ मध्ये केडगाव परिसरात घर बांधण्यासाठी प्लॉट पहात होतो. ओळखीचे तुकाराम कोतकर व गणेश लोंढे यांनी केडगाव दुधसागर सोसायटी परिसरात साधना बाळासाहेब औटी यांचा बिगरशेती प्लॉट आमच्याकडे विक्रीस असल्याचे सांगितले. त्यांनी प्लॉटची नोटरी साठेखत दाखवून विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्या प्लॉटची किंमत प्रतिगुंठा ८ लाख रुपये ठरली. त्याप्रमाणे पूर्ण प्लॉटची किंमत २४ लाख ७६८ रुपये ठरली. तसेच तुकाराम कोतकर यांनी याच परिसरातील मालक प्रेम चिन्ना काझी रेड्डी यांचा बिगरशेती प्लॉट माझेकडे विक्रीस आहे असे सांगुन त्यांनी फिर्यादी यांना नोटरी साठेखत दाखविले. त्यानंतर त्या प्लॉटची किंमत प्रतिगुंठा ७ लाख रुपये ठरली. त्याप्रमाणे पूर्ण प्लॉटची किंमत २९ लाख ८२ हजार रुपये ठरली.
त्यानंतर प्लॉटचे इसारापोटी गणेश ऊर्फ भाईजान लोंढे यांना २ मार्च २०२४ ते ३ जून २०२४ दरम्यान वेळोवेळी शहर सहकारी बँक शाखा भूषणनगर केडगाव येथून आरटीजीएसद्वारे
८ लाख रुपये, फोन पे द्वारे २ लाख ५६ हजार रुपये व रोख स्वरुपात २ लाख ४४ हजार रुपये असे एकुण १३ लाख रुपये दिले. तसेच, तुकाराम कोतकर यांना एचडीएफसी बँक शाखा केडगाव या बँकेतून १६ एप्रिल २०२४ रोजी आरटीजीएसद्वारे ४ लाख ४० हजार रुपये व फोन पेद्वारे ४० हजार रुपये असे एकूण ४ लाख ८० हजार रुपये दिले आहे. मात्र, तुकाराम कोतकर व गणेश लोंढे यांनी प्लॉटची खरेदी दिली नाही. इसारापोटी घेतलेले १७ लाख ८० हजार रुपये परत न करता विश्वासघात केला. पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष लगड गुन्ह्याचा तपास करीत आहेत.