अहिल्यानगर- पावसाळा सुरू होवून महिन्याभराचा कालावधी उलटला आहे. सुरूवातीच्या या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने उगवण झालेली पिके सुकू लागली आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. या पार्श्वभुमीवर कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीपासाठी गुरूवारी रात्री पासूनच आवर्तन सोडण्याच्या जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जूलै महिना सुरू झाला असून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच भागातील उगवन झालेली पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने सद्य परिस्थितीत धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचा अंदाज घेवून ओव्हर फ्लोचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना देण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी मंत्रालयात विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक घेतली. त्यानूसार गुरूवारी रात्री पासूनच आवर्तन सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा लाभ अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राला होईल.

सद्यपरिस्थितीत लाभक्षेत्रात अपेक्षे इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना धोका होण्याचे गांभिर्य आहे. लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, शेतकरी यांनीही आवर्तन सोडण्याच्या मागणीचा विचार करून जलसंपदा विभागाने आवर्तन सोडण्याच्या निर्णय केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांतील येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना पाणी मिळेल असे काटेकोर नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.