साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !

Published on -

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान व साईबाबांविषयी समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती ही अत्यंत गंभीर व दुःखद बाब आहे. या अपप्रचाराविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या दुर्भावनायुक्त प्रचारास कोणत्याही स्वरूपात प्रोत्साहन दिले जाणार नाही.

अलीकडेच समाजमाध्यमांवर “श्री साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे” असा खोटा व भ्रामक व्हिडिओ प्रसारित झाला. संस्थानने यावर स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, हज यात्रेसाठी कोणताही निधी वितरित करण्यात आलेला नाही. अशा प्रकारचे दावे खोटे, निराधार असून भक्तांच्या श्रद्धेशी खेळ करणारे आहेत.

दोन व्यक्तींनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर श्री साईबाबांविषयी आक्षेपार्ह, अपमानास्पद विधाने केली आहेत. याबाबत संस्थानने त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली असून, राहाता येथील माननीय न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम आदेश देत संबंधितांना श्री साईबाबांविषयी कोणतेही बदनामीकारक किंवा अपमानकारक विधान करू नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे.

श्री साईबाबा संस्थानचा संपूर्ण कारभार “श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम, २००४ नुसार पूर्णतः पारदर्शक व नियमानुसार केला जातो. संस्थानकडे येणाऱ्या देणग्यांचा उपयोग ५५० खाटांचे
आधुनिक रुग्णालय, आशियातील सर्वात मोठे प्रसादालय, शैक्षणिक संकुल, भक्तनिवास व इतर सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी केला जातो. देणगी केवळ अधिकृत दानपेट्या व अधिकृत काउंटरवरच स्वीकारली जाते. इतर कोणत्याही स्वरूपाची आर्थिक देवाणघेवाण केली जात नाही.

संस्थानच्या तात्पुरत्या समितीस ५० लाखांपर्यंत खर्चाचे स्वातंत्र्य आहे. त्यापुढील खर्चासाठी माननीय उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. श्री साईबाबांवरील श्रद्धा व भक्ती जपणाऱ्या लाखो भक्तांच्या भावना आणि संस्थानची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, भविष्यातही अशा प्रकारच्या अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलली जातील, असे गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!