पुणतांबा- शाळा व महाविद्यालयांची नवीन शैक्षणिक वर्षे १६ जूनपासून सुरू झालेली असताना, पुणतांबा येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध न झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन पुणतांबा व श्रीरामपूरसाठी नियमित आणि वेळेवर बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, की पुणतांबा येथून राहाता या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांनी आणि विद्यार्थ्यांनी सातत्याने बससेवेची मागणी केली आहे. मात्र, आजपर्यंत या मार्गावर कोणतीही बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिक आणि विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे वेळेवर महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले आहे आणि शैक्षणिक नुकसान होत आहे.

कोपरगावहून सकाळी सोडण्यात येणाऱ्या बसेस वेळेवर पुणतांब्यात पोहोचत नसल्यामुळे श्रीरामपूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. सकाळच्या कॉलेजसाठी विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे आवश्यक असून, बस उशिरा आल्यास महत्त्वाच्या तासिका बुडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणतांबा येथील जुन्या बसस्थानकाची स्थिती अत्यंत खराब असून, त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि सार्वजनिक सुविधांसाठी हे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, वरिष्ठ पातळीवर लवकरच पाठपुरावा करून पुणतांबा व श्रीरामपूरसाठी नियमित बससेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच पुणतांबा-राहाता मार्गावरील दीर्घकालीन मागणी असलेली बससेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी गणेश बनकर, प्रभाकर बोरबने, गणपत बोरबने यांनी ग्रामस्थांच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन दिले.