श्रीरामपूर- भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तृप्ती देसाई यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओद्वारे दिनकर यांच्यावर काही आरोप केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून दिनकर यांनी देसाई यांच्याविरुद्ध बदनामीच्या हेतूने खोटे आरोप केल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
नितीन दिनकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावर तृप्ती देसाई यांनी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून प्रसारित केला असून, त्यातून त्यांची, त्यांच्या पक्षाची, कुटुंबाची व अल्पवयीन मुलीची बदनामी करण्यात आली आहे. व्हिडिओमधील संदर्भ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले असून, हेतुपुरस्सरपणे खोटे आरोप करण्यात आले असल्याचे दिनकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करत आहेत. तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे या प्रकरणाबाबत तक्रार ईमेलद्वारे पाठवली असून, नितीन दिनकर यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.