अजून थोडा पाऊस आला असता तर मुळा धरणाऱ्या बाबतीत घडला असता ‘हा’ ऐतिहासिक विक्रम, मात्र थोडक्यात संधी हुकली

Published on -

राहुरी- नगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणाची स्थापना १९७२ साली झाली. दरवर्षी कोणता ना कोणता विक्रम या धरणाच्या बाबतीत घडत असतो. यंदाच्या वर्षी मात्र एक ऐतिहासिक संधी हुकली आहे. ती संधी म्हणजे मुळा धरण जून महिन्यात निम्मे म्हणजेच ५० टक्के भरण्याचा विक्रम. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये ५० टक्क्यांपर्यंत साठा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती.

गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीत जून महिन्यात मुळा धरण फार क्वचितच निम्मे भरले आहे. यंदा मात्र जूनच्या अखेरीस धरणात सुमारे ४५ ते ४८ टक्क्यांपर्यंत साठा झाला होता. मात्र, त्याचवेळी पावसाने हुलकावणी दिली. जूनच्या अखेरच्या दिवशी पुन्हा पावसाने हजेरी लावली असली, तरीसुद्धा जूनमध्ये मुळा निम्मे भरले नाही आणि विक्रम हुकला. ३० जून रोजी अपेक्षित असलेली भर १ जुलैपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वाटत होती, पण प्रत्यक्षात २ जुलै २०२५ रोजी मुळा धरणाचा साठा १३ हजार २७४ दशलक्ष घनफूटवर पोहोचला आणि धरण ५० टक्के भरले.

गेल्या २५ ते ३० वर्षांच्या काळात मुळा धरण १३ वेळा जुलै महिन्यात निम्मे भरले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ५० टक्के साठा झाल्याचीही उदाहरणे आहेत. यंदा मात्र जून महिन्यातच निम्मे भरण्याच्या क्षणापर्यंत साठा पोहोचला होता. अखेर २ जुलैला धरणाने ५० टक्क्यांचा टप्पा गाठला.

यापूर्वी २००६, २००७ आणि २००८ या वर्षांत मुळा धरणाने अनेक विक्रम गाजवले आहेत. त्यामध्ये मुळा नदीपात्रातून जायकवाडी कडे तब्बल ४४ हजार क्यूसेकने पाणी सोडण्याचा विक्रम आणि पाणलोट क्षेत्रातून तब्बल ५५ ते ६० हजार क्यूसेस पाण्याची आवक झाल्याचे विक्रम आहेत. तसेच २००४ मध्ये मुळा धरणात नीचांकी ४२५० दलघनफूट पाणीसाठा झाल्याचाही विक्रम सर्वश्रुत आहे.

सध्या मुळा धरणाची पाणीपातळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा होत आहे. २ जुलैअखेर धरणात १३ हजार २६५ दलघनफूट पाणीसाठा असून कोतुळ येथून ५६३८ क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. ही आवक काहीशी चढ-उतार करत असली तरी सातत्याने सुरू आहे. मुळा धरणाच्या सद्यस्थितीकडे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता आर. जे. पारखे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत.

मुळा धरणाची सायंकाळी ६ वाजता परिस्थिती- लेव्हल १७८५ फूट, धरणातील साठा १४०९० एमसीएफटी, धरणात कोतुळ येथून पाण्याची १२०४१ क्यूसेकने आवक सुरु असून धरण निम्मे भरले असल्याचे उपभियंता व्ही. डी. पाटील यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!