Maharashtra Railway : राज्याला आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. मराठवाडा आणि खानदेश या दोन विभागांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग रेल्वे विभागाकडून तयार केला जाणार असून या नव्या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान याच नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट सुद्धा समोर आली आहे.
या दोन शहरा दरम्यान तयार होणार नवा रेल्वे मार्ग
मराठवाड्यातील जालना ते खानदेशातील जळगाव या दोन शहरा दरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. जालना – जळगाव रेल्वे मार्ग 174 किलोमीटर लांबीचा राहणार असून या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याआधीच एक महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

ते म्हणजे प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याआधीच या प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. ड्रोन सर्वेक्षणाच्या मदतीने प्रशासनाकडून या प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनीची, शेतीची, फळबागांची, विहिरींची तसेच इतर मालमत्तांची माहिती गोळा करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पासाठी तीन गावात भूसंपादनाच्या अनुषंगाने मोजणी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर व भोकरदन या तालुक्यात भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यात आली आहे.
कसा असणार प्रकल्प ?
या प्रकल्प अंतर्गत एकूण 17 नवीन रेल्वे स्थानक विकसित केली जाणार आहेत. 174 किलोमीटर लांबीच्या या मार्गात एकूण 130 छोटे पूल तयार होणार आहेत. तीन नद्यांवर मोठे पूल तयार केले जाणार आहेत.
याशिवाय या मार्गावर तीन बोगदे देखील तयार केले जातील. या प्रकल्पासाठी ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर गुगल अर्थच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या जमीन मालकांना लवकरात लवकर मोबदल्याची रक्कम मिळू शकणार आहे.
या प्रकल्पासाठी जालना व बदनापूर तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी आणखी एका महिन्याचा कालावधी लागणार आहे तर भोकरदन तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी बदनापूर तालुक्यातील दावळवाडी, खादगाव आणि नजीकपांगरी या तीन गावांमध्ये जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात जमिनीची मोजणी सुरू झाली आहे. यामुळे लवकरच तालुक्यातील सर्व गावांमधील जमिनीची मोजणी पूर्ण होणार आहे.
जालना आणि भोकरदन तालुक्याबाबत बोलायचं झालं तर जालना तालुक्यातील एक आणि भोकरदन तालुक्यातील आठ गावांमध्ये या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाईल. विशेष म्हणजे याही तालुक्यांमध्ये जमीन मोजणीची कारवाई सुरू झाली आहे.
नव्या रेल्वे मार्गावर 17 स्थानके विकसित होणार
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासात गेम चेंजर ठरणारा जालना – जळगाव रेल्वे मार्ग प्रकल्प अंतर्गत नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिनागाव ही रेल्वे स्थानक विकसित केली जाणार आहेत.