जगभरात नियम आणि कायदे ही कोणत्याही देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि शिस्तीसाठी आवश्यक गोष्ट असते. पण काही वेळा हे कायदे इतके विचित्र आणि चकित करणारे असतात की त्यांचं अस्तित्व समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. आपण सर्वसामान्यपणे समजतो की कायदे म्हणजे गुन्हेगारी थांबवणं, नागरिकांची सुरक्षा आणि सार्वजनिक शिस्त राखणं, पण काही देशांनी असे नियम बनवले आहेत की ऐकल्यावर तुम्हाला थक्क व्हायला होईल.
स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडसारख्या शांत आणि सुंदर देशात एक विचित्र नियम आहे, रात्री 10 नंतर तुम्ही शौचालय फ्लश करू शकत नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या शांततेत फ्लशचा आवाज शेजाऱ्यांच्या झोपेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हा कायदा केला गेला आहे. एका दृष्टीने पाहता हा नियम सामाजिक भान ठेवण्याची एक जागरूकता आहे, पण तरीही बहुतेकांना तो विचित्रच वाटेल.
उत्तर कोरिया
उत्तर कोरियामध्ये तर थेट तुमच्या कपड्यांवर बंधन आहे. तिथे निळ्या जीन्स घालणं बेकायदेशीर मानलं जातं. कारण ही पाश्चिमात्य संस्कृतीचं प्रतीक मानली जाते. तिथलं सरकार लोकांवर एवढं नियंत्रण ठेवतं की त्यांच्या कपड्यांमधूनही त्यांनी परदेशी प्रभाव टाळावा, अशी अपेक्षा आहे. अशा ठिकाणी वैयक्तिक अभिव्यक्तीची संकल्पनाच हरवून बसते.
श्रीलंका
श्रीलंका देशात धार्मिक संवेदनशीलता खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे भगवान बुद्धांच्या मूर्तींसोबत सेल्फी घेणं हा गुन्हा समजला जातो. तिथे असा विश्वास आहे की अशा वर्तनामुळे धर्माचा अवमान होतो. त्यामुळे सेल्फी सारख्या आजच्या सामान्य सवयीही तिथे चुकीच्या समजल्या जातात.
डेन्मार्क
डेन्मार्कसारख्या आधुनिक आणि प्रगत देशातही एक कठोर नियम आहे, सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे घालणं बेकायदेशीर आहे. 2018 मध्ये हे धोरण लागू करण्यात आलं. मुख्यतः सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कोण आहे हे ओळखता येईल.
ग्रीस
ग्रीस या ऐतिहासिक वारशाने समृद्ध देशात आणखी एक अजब नियम आहे. ऐतिहासिक स्थळांवर उंच टाचांचे शूज घालणं बंदीकारक आहे. कारण त्या टाचांमुळे हजारो वर्षांपासून टिकून असलेल्या पायऱ्या खराब होऊ शकतात. ऐतिहासिक ठिकाणांच्या संवर्धनासाठी असा निर्णय घेतला गेला आहे.
हे नियम आपल्याला विचित्र वाटू शकतात, पण त्यामागे प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा, आणि स्थानिक गरज दडलेली असते. कधी कधी कायदे समाजाच्या भल्यासाठी असतात, पण कधी कधी ते इतके अनाकलनीय वाटतात की डोके फिरल्याशिवाय राहत नाही.