कुंडलीतील शुक्र बळकट करायचाय?, श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करा ‘हा’ विशेष उपाय!

भारतीय संस्कृतीत मेहंदी ही केवळ सौंदर्यवर्धक गोष्ट नाही, तर तिच्या मागे एक खोल, अध्यात्मिक आणि भावनिक अर्थ दडलेला आहे. कोणताही सण, व्रत किंवा विवाह विधी मेहंदीशिवाय पूर्ण झाल्यासारखाच वाटत नाही. पण ज्या गोष्टीला आपण इतकं सहज स्वीकारतो, तिच्या मागे ज्योतिषशास्त्रातले एक सुंदर रहस्य दडलेलं आहे आणि ते म्हणजे शुक्र ग्रहाशी असलेला मेहंदीचा संबंध.

हातावर लावलेली ही हिरवट-तपकिरी छटा केवळ नजरेला गोड वाटत नाही, तर ती आपल्या ग्रहबलावरही परिणाम करते, असं मानलं जातं. विशेषतः शुक्र ग्रह जो सौंदर्य, प्रेम, सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि नात्यांचं प्रतीक आहे, त्याला बळकट करण्यासाठी मेहंदी अत्यंत प्रभावी मानली जाते. म्हणजेच, जेव्हा एखादी स्त्री आपल्या हातावर मेहंदी लावते, तेव्हा ती केवळ सजत नाही, तर तिच्या कुंडलीत एक अनुकूल बदल घडवून आणते.

श्रावण महिन्यातील महत्व

 

श्रावण महिन्याचं वातावरण आणि त्यात साजरी होणारी ही परंपरा यामध्ये एक वेगळीच दिव्यता असते. पावसाच्या सरसरत्या थेंबांमध्ये जसं आभाळ भरून येतं, तसंच या महिन्यात मेहंदी लावणं म्हणजे भोलेनाथ आणि पार्वती मातेला प्रसन्न करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. असं म्हटलं जातं की या काळात मेहंदी लावल्याने केवळ धार्मिक फल नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. अनेक स्त्रियांनी असं अनुभवलेलं असतं की या महिन्यात लावलेली मेहंदी त्यांच्या आयुष्यात थोडीशी सुखद वळणं घेऊन येते.

नात्यांत येतो गोडवा

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहंदीचा नात्यांवर होणारा परिणाम. अनेक घरांमध्ये वयस्कर स्त्रिया अजूनही सांगतात की विवाहाच्या काही दिवस आधी मेहंदी लावली की नवविवाहित जोडीदारांमध्ये एक वेगळी जवळीक निर्माण होते. तसेच मेहंदी लावल्यामुळे मन शांत होते , ज्यामुळे मानसिक स्थैर्य वाढतं आणि मन अधिक प्रेमळ होतं. असंही मानलं जातं की स्त्रिया जर नियमितपणे मेहंदी लावत असतील, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहतो आणि पतीलाही उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभतं.

या साऱ्या पारंपरिक आणि ज्योतिषशास्त्रीय विश्वासांमुळे मेहंदी एकदम खास ठरते. ती फक्त सौंदर्याचं चिन्ह नाही, तर श्रद्धा, प्रेम, आणि ग्रहशांती यांचं एक सजीव प्रतीक आहे.