जर तुम्ही आयटीआर फाईल करताना पासवर्ड विसरला असाल, तर काळजी करू नका. तांत्रिक अडचणी असल्या, तरी आधुनिक डिजिटल युगात प्रत्येक समस्येचं उत्तरही सोपं आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेट बँकिंगद्वारे सहज आयटीआर भरण्याची सुविधा.

आता 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 ही निश्चित करण्यात आली आहे. पण अनेक वेळा जेव्हा आपण पोर्टलवर लॉगिन करताना पासवर्ड विसरतो, तेव्हा सिस्टीमवर अडकून राहतो. मात्र, आता पासवर्ड लक्षात नसतानाही तुम्ही तुमचा आयटीआर सहज भरू शकता, तुमच्या बँकेच्या नेट बँकिंगद्वारे.
जाणून घ्या प्रोसेस
या प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://www.incometax.gov.in वर जावं लागेल. तिथे ‘Login’ या पर्यायावर क्लिक केल्यावर ‘Net Banking’ हे लॉगिनचे एक वेगळं दालन उघडतं. यामध्ये विविध बँकांची यादी दिली जाते. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात, ती निवडून त्या बँकेच्या नेट बँकिंग पेजवर लॉगिन करावं लागतं.
लॉगिन केल्यावर तुम्हाला ‘Login to e-filing portal’ किंवा ‘Continue to e-filing portal’ असा एक पर्याय दिसतो, त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही थेट इनकम टॅक्स पोर्टलवर पोहोचता. एकदा पोर्टलवर गेल्यावर, मेनू बारमधून ‘e-File’ या पर्यायावर टॅप करा आणि पुढे ‘Income Tax Return’ या सेक्शनमध्ये प्रवेश करा. ‘File Income Tax Return’ हा पर्याय उघडल्यावर तुम्हाला फक्त आर्थिक वर्ष निवडायचं असतं, हे वर्ष असेल 2024-25.
यानंतर फाइलिंगची पद्धत निवडताना ‘Online’ या पर्यायावर क्लिक करा. त्यामुळे तुम्ही फॉर्म थेट पोर्टलवरच भरू शकता. आता तुमच्या उत्पन्न आणि व्यावसायिक गटानुसार ITR फॉर्म निवडायचा असतो उदा. ITR-1, ITR-2 वगैरे. फॉर्ममध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर ‘Preview and Submit’ हा टप्पा येतो, जेथे सर्व तपशील नीट तपासून नंतरच ‘Submit’ करावं लागतं.
‘e-Verification’ कसं कराल?
पण फॉर्म सबमिट झाल्यानंतरही तुमचं काम संपत नाही. आयकर विभागाकडे हे रिटर्न वैध मानले जावं यासाठी त्याचं ‘e-Verification’ करणं आवश्यक आहे. आणि हे करायची मुदत आहे फाईल केल्यापासून 30 दिवसांच्या आत. हेही काम तुम्ही नेट बँकिंगनेच करू शकता. पुन्हा एकदा पोर्टलवर जाऊन ‘e-File’ सेक्शनमध्ये ‘Income Tax Return’ वर क्लिक करा. नंतर ‘e-Verify Return’ हा पर्याय निवडा आणि ‘e-verify using Net Banking’ हे पर्याय निवडा. बँकेच्या पेजवर लॉगिन करून ‘Proceed to e-filing Portal’ वर क्लिक केल्यावर, verification पूर्ण होईल.
ही संपूर्ण प्रक्रिया वापरकर्त्यासाठी अधिक सुलभ करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. पासवर्ड विसरला तरीही, तुमच्या बँकेच्या डिजिटल खात्याचा उपयोग करून तुम्ही आयकर रिटर्न भरू शकता आणि ते वैधपणे पडताळू शकता.
मात्र, 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही ही प्रक्रिया केली नाही, तर तुम्हाला ₹5,000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो. इतकंच नव्हे तर अनेक महत्त्वाचे कर लाभही तुम्ही गमावू शकता.