लघवीतून फेस येणे ही एक अशी बाब आहे, जी अनेकांना एखाद्या क्षणी जाणवते, पण त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आपण ती फक्त पाणी कमी प्याल्याने झाली असे समजतो किंवा गृहीत धरून दुर्लक्ष करतो. पण शरीर आपल्याला अनेक वेळा अशा लक्षणांतून काहीतरी सांगत असते. म्हणूनच लघवीमध्ये फेस येणं म्हणजे केवळ एक साधी गोष्ट नाही, तर त्यामागे काही आरोग्यविषयक संकेत लपलेले असू शकतात.

आपल्या शरीरातील लघवी ही केवळ टाकाऊ द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी नसून, ती आरोग्याचा आरसा देखील आहे. लघवीचा रंग, गंध, आणि स्वरूप बघून शरीरात काय सुरू आहे याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळेच डॉक्टर आपल्या लघवीबद्दल नेहमी विचारतात. लघवीत फेस म्हणजेच बुडबुडे येत असल्यास, ते एका पद्धतीने शरीरात काहीतरी बिनसल्याचा इशारा असू शकतो.
‘प्रोटिन्युरिया’ म्हणजे?
जेव्हा लघवीमध्ये सतत फेस येतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. ही लक्षणं अनेक वेळा प्रथिनांच्या गळतीशी संबंधित असतात. सामान्यतः आपल्या मूत्रपिंडांचे काम असतं रक्तातून टाकाऊ घटक गाळून शरीराबाहेर टाकणे. पण जेव्हा मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरातील महत्त्वाची प्रथिनं देखील लघवीतून बाहेर पडतात. आणि त्यातूनच बुडबुडे तयार होण्याची शक्यता वाढते. ही स्थिती ‘प्रोटिन्युरिया’ म्हणून ओळखली जाते.
याशिवाय, शरीरात पाण्याची कमतरता देखील या समस्येचे एक मुख्य कारण असू शकते. जेव्हा आपण पुरेसे पाणी घेत नाही, तेव्हा लघवी अधिक सघन होते आणि तिच्या रचनेत बदल होऊन फेस तयार होतो. त्यामुळे दैनंदिन पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये युटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन देखील एक सामान्य समस्या झाली आहे. यामध्ये जळजळ, वारंवार लघवी लागणे आणि फेस येणे ही लक्षणं दिसतात. लघवीतून फेस येणे ही एका गंभीर स्वरूपाच्या युटीआयची सुरुवात देखील असू शकते.
याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे, ही लक्षणं क्रॉनिक किडनी डिसीजसारख्या दीर्घकालीन आणि गंभीर आजाराकडे इशारा देऊ शकतात. सीकेडीमध्ये मूत्रपिंड हळूहळू कार्य थांबवू लागतात, आणि शरीरात टॉक्सिन्स साचू लागतात. अशा अवस्थेत लघवीत फेस दिसणे हे एक महत्त्वाचं लक्षण ठरू शकतं.
म्हणूनच, अशी लक्षणे दुर्लक्ष करू नका. काही वेळा ते तात्पुरतं आणि सामान्य असू शकतं, पण जर ते रोजच्या सवयीसारखं होत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.