शनीची साडेसाती ही गोष्ट ऐकली की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. ही एक अशी वेळ असते जी माणसाला मानसिक, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक परीक्षा देते. पण या काळात खचून न जाता जर योग्य उपाय, संयम आणि श्रद्धा ठेवली, तर शनीही कृपा करतो अशी मान्यता आहे. आता पुन्हा एकदा शनी आपली गती बदलत आहे आणि या नवीन स्थितीत काही राशींना पुढील 4 वर्षे साडेसातीचा फटका बसणार आहे.

सध्या शनिदेव मीन राशीत प्रवेश करत आहेत आणि 2027 पर्यंत ते तिथेच स्थिर राहणार आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार, तीन राशींवर शनीचा प्रभाव अधिक तीव्र होईल. या राशींमध्ये मेष, मीन आणि कुंभ राशींचा समावेश आहे.
मेष राशी
मेष राशीवर साडेसातीची सुरूवात होत आहे. हा काळ विशेषतः कामकाजाच्या क्षेत्रात अडथळ्यांचा असतो. अगदी एखादं काम सुरू करताच ते बिघडण्याची शक्यता वाढते. उत्पन्नाचं गणित बिघडतं आणि कर्जाचा भार वाढू शकतो. मानसिक थकवा आणि आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. अनेकांना आपली मेहनत वाया गेल्यासारखी वाटू शकते.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी हा साडेसातीचा दुसरा टप्पा आहे, जो अधिक खडतर मानला जातो. या टप्प्यात माणसाची सहनशक्ती खऱ्या अर्थाने परीक्षेत टाकली जाते. तुमच्या कामात अडथळे, अपेक्षित परिणाम न मिळणं आणि आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता असते. याशिवाय, घरातील वातावरणही तणावपूर्ण होऊ शकतं.
कुंभ राशी
कुंभ राशीसाठी हा साडेसातीचा शेवटचा टप्पा असला तरी तोही सहजगत्या जात नाही. कामात मन लागत नाही, काही अनपेक्षित खर्च उभे राहतात, आणि आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते. काही वेळा जुन्या चुका त्रासदायक ठरू शकतात.
उपाय काय?
या कठीण काळात सकारात्मक राहणे फार महत्त्वाचे असते. जर तुम्ही या राशींपैकी असाल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय नियमित करणे उपयुक्त ठरू शकते. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे, शनि चालीसा पठण करणे, पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करणे आणि गरिबांना काळी मसूर दान देणे हे उपाय तुमच्या मनाला आणि कर्माला स्थिर ठेवू शकतात.