अहिल्यानगर- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देय असलेल्या फरकाच्या रकमा स्वतःच्या खात्यात वळवून सुमारे ४ कोटी १४ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी अफरातफरीची ही रक्कम शासनाच्या खात्यात १८ जुलैपर्यंत भरावी, अशा आशयाच्या वसुलीच्या नोटिसा ५६ जणांना बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागा अंतर्गत कर्मचाऱ्यांना देय असलेल्या फरकाच्या रकमा स्वतःच्या खात्यावर वळवल्याचा प्रकार एका महिन्यापूर्वी समोर आला होता. याप्रकरणी चौकशीसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने पुराव्यासह चौकशी अहवाल सादर केला होता.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी संबंधित ५६ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. मागील सात ते आठ वर्षांत सुमारे २ कोटी ३४ लाखांचा मूळ घोटाळा, तर ४ कोटी १४ लाखांचा आक्षेपित घोटाळा या चौकशी अहवालातून समोर आला. त्यामुळे प्रकरणातील सुमारे ५६ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
या नोटिसीत वसुलीची रक्कम १८ जुलै २०२५ पर्यंत शासनाच्या खात्यात भरावी, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
अकोले तालुक्यातील शेंडी, मवेशी, कोतूळ येथील आरोग्य केंद्र तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ४ कोटी १४ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांच्या अंतर्गत गठित समितीने या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, या चौकशी समितीने सुमारे एक हजार पानांचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे पाठवला होता.
हा चौकशी अहवाल आल्यानंतर जि. प. सीईओ भंडारी यांनी या प्रकरणातील ५६ जणांना त्यांच्या नावे व वसुलीच्या रकमेसह नोटिसा बजावल्या आहेत. संबंधिताकडून आता ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील हा घोटाळा समोर आल्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.
संबंधितांना पैसे भरण्यासाठी १८ जुलैची मुदत दिली
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ४ कोटी १४ लाख रुपयांच्या अफरातफरप्रकरणी संबंधित ५६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांना १८ जुलैची पैसे भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणातील कर्मचाऱ्यांची नावे व रकमा निश्चित केल्या करण्यात आल्या आहेत. पैसे भरण्याच्या १८ जुलै २०२५ च्या मुदतीनंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. – आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
चौकशी अहवालातून घोटाळेबाजांची नावे वाढली
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील अफरातफर प्रकरणी तीन कनिष्ठ सहाय्यकांसह वरिष्ठ सहाय्यक लेखा व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ५६ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. सुरुवातीला यामध्ये फक्त तीन कर्मचाऱ्यांची नावे होती. चौकशी अहवालात मात्र घोटाळा करणारांची संख्या वाढली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरकाच्या रकमा परस्पर स्वतःच्या व इतरांच्या खात्यावर वळवल्या. यामध्ये ५६ जणांची नावे समोर आली, असे जि. प. सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.