अहिल्यानगरमधील केडगाव ते निंबळक बायपासवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा अपघाती मृत्यू!

Published on -

वाळकी- केडगाव ते निंबळक बायपास रस्त्यावर कल्याण रोड बायपास चौकात असलेल्या उड्डाणपुलाच्या जवळच अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ४ जुलै) सकाळी उघडकीस आली आहे.

वनविभागाचे पथक सोनेवाडी येथे असतानाच त्यांना बायपास रस्त्यावर एक बिबट्या मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पथक तातडीने कल्याण बायपास चौकातील उड्डाणपुलाच्या पुढे त्या ठिकाणी गेले. त्यांनी मृत बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात चारचाकी वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या मृत बिबट्याला वाहनात टाकून शेंडी जवळील नर्सरीत शवविच्छेदन करण्यासाठी नेले. या बिबट्याचा मृत्यू साधारण पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान झाला असावा अशी शक्यता वनविभागाच्या पथकाने वर्तविली.

नगर शहर परिसरात विशेषतः सीनानदीच्या पट्टयात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. गुरुवारी (दि.३ जुलै) तर भर दुपारी १२.३० वाजता बोल्हेगाव येथील सीना नदीच्या पुलाखाली बिबट्या दिसला होता. तेथे वनविभाग, पोलिसांसह ३०० ते ४०० लोकांचा जमाव जमला होता. मात्र काही वेळाने बिबट्याने तेथून पलायन केले. या शिवाय ५ जून रोजी पहाटेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यात बिबट्याने शेतकरी अशोक चिपाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला करून तिचे लचके तोडले. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झालेला आहे.

तसेच रोहकले मळा, चिपाडे मळा, बोरुडे मळा, कातोरे वस्ती व सीना नदीच्या परिसरात अनेक वेळा बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे. या शिवाय वडगाव गुप्ता शिवार, जेऊर परिसर, चांदबीबी महाल परिसर या भागात तर बिबटे कायमच आढळून येतात. नगर शहर परिसर आणि तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये विशेष करून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले असून वन विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

काळेवाडी व कापूरवाडी येथेही बिबट्याचा वावर

नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात असलेल्या बारेमळा येथील ऊसाच्या शेतात २९ जून रोजी सायंकाळी बिबट्याची चार पिल्ले आढळून आली होती. मात्र मादी बिबट्याने रात्रीतून पिल्लांसह स्थलांतर केले होते. त्यानंतर १ जुलै रोजी पहाटे काळेवाडी (हिवरे झरे) शिवारात एक बिबट्या दिसला होता. त्या ठिकाणी २ जुलै रोजी वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक अशोक गाडेकर, वनसेवक अर्जुन खेडकर, तसेच वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढत त्या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे. कापूरवाडी शिवारात तर यापूर्वीच पिंजरा लावण्यात आलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!