कर्जत- तुम्हाला तुमच्या वाट्याची जमीन तुमच्या नावावर करुन द्यायची आहे असे सांगून कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयात हक्क सोडपत्र करून घेतले. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला याबाबत तिघी बहिणींनी महसुल विभागाकडे हक्क सोडपत्र रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील गोयकरवाडी येथील रहिवासी भाऊ सहादू टकले यांची सात एकर जमीन होती. भाऊ टकले यांचे २००८ मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा संभाजी भाऊ टकले, देवराव भाऊ टकले, मुली कलावती बापु खांडेकर, शिलावती बापु कोरे, लोचना विश्वनाथ ईरकर हे वारस लागले आहेत. कलावती खांडेकर, शिलावती कोरे, व लोचना ईरकर यांचा भाऊ संभाजी टकले यांनी या तिन्ही बहिनींना सांगितले की, तुम्हाला तुमच्या वाट्याची जमीन तुमच्या नावावर करुन द्यायची आहे. त्यासाठी तुम्ही कर्जत तहसील कार्यालयात या असे म्हणुन बोलावून घेतले.

दुय्यम निबंधक कार्यालयात आल्यानंतर हक्क सोडपत्रावर अंगठे घेतले हा प्रकार गेल्या महिन्यात १८ जुन रोजी घडल. या तिघी बहिणी अशिक्षित आहेत. या बहिणींनी त्यांच्या घरी सांगितले, यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बाबत त्यांचा भाऊ संभाजी टकले यांच्याकडे विचारणा केली असता मी तुमचा हक्क काढून घेतला आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, यानंतर तिघी बहिणींनी मंडल अधिकारी व कामगार तलाठी यांच्याकडे झालेल्या फसवणूकीबाबत लेखी तक्रार अर्ज दिला असून यात हक्कसोड पत्राची नोंद रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकार लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करत आहे, संरक्षण पुरवत आहे असे असताना कर्जत तालुक्यातील गोयकरवाडी येथील सख्या भावाने तिघी बहिनींची फसवणूक केली आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल विभाग याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.