सोनई- सोनईजवळील कारखाना परिसरात अवैधपणे सुगंधित मावा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ८० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकास अटक झाली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शनिशिंगणापूर- सोनई रस्त्यालगतच्या कारखाना परिसरातील चार नंबर ठिकाणी सुगंधित मावा तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून खालील मुद्देमाल जप्त केला. २० हजार रुपये किमतीचा सुगंधित माचा, ७५०० रुपये किमतीचा पाच किलो तंबाखू व सुपारीचे मिश्रण, ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी मशीन, ३ हजार रुपये किमतीचा मिक्सर आणि १०० रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या असा एकूण मुद्देमालाची किंमत ८० हजार ६०० रुपये आहे.

या कारवाईत तव्युब बिबन शेख (वय ३२, रा. पानसवाडी, ता. नेवासा) याला पोलिसांनी अटक केली असून जितेंद्र नरेंद्र चांडक उर्फ जितू मालपाणी (रा. मनमाड) हा फरार आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या तय्युब शेख याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे आणि अशोक लिपणे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाचासाहेब लबडे करत आहेत.